आसपासच्या धगीतून मातीचा गंध घेवून दरवळणारी हिरवी कविता
मराठी साहित्यात महिला भगिनींनी एक समृध्द परंपरा निर्माण केली आहे. याच कवितेच्या समृध्द वाटेवर ‘सीझर कर म्हणतेय माती’ हा माता आणि मातीच्याकुसीचा आतला आवाज आपल्या पदर गाठीला बांधून कल्पाना दुधाळ नावाची शांत स्वभावाची कवयित्री कवितेच्या दिंडीत बोरी भडक येथून सामील झाली.
– प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आणि लेखक आहेत)
मराठी साहित्यक्षेत्रात विशेषत: काव्यक्षेत्रात अनेक महिलानी सकस पद्धतीने लेखन केले आहेत. महानुभाव, वारकरी संप्रदायापासून महिलांनी साहित्यक्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिले आहे. ती मोठी परंपरा आहे. त्यानंतरच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात साहित्याचे दालन स्त्रियांनी समृध्द केलं. उदाहरणादाखल कवयित्री पद्मा गोळे,इंदिरा संत, शांता शेळके ,शिरीष पै ,मल्लिका अमर शेख तसेच वर्तमानकाळातील कवयित्री अनुराधा ढेरे ,अनुराधा पाटील, आसावरी काकडे ,अश्विनी धोंगडे,नीरजा ,प्रज्ञा लोखंडे ,हिरा बनसोडे, कविता महाजन, रेखा बैजल, रामकली पावसकर , सुमती लांडे ,आसावरी काकडे तर नव्या पिढीतील सुचिता खल्लाळ, संजीवनी तडेगावकर, स्वाती शिंदे, तृप्ती आंधळे ,प्रिया जामकर,शिल्पा देशमुख ,सारिका उबाळे,अशा अनेक महिला आपापल्या शैलीत लिहित आहेत.
कल्पना दुधाळ यांची कविता ग्रामीण जीवनाचं सकल समांतर वास्तव मांडत येते. तिथल्या व्यथा-वेदना मांडत येते. कल्पना दुधाळांची कविता ही मातीतून येणाऱ्या पिकासारखी आहे .त्यामुळे त्यांच्या कवितेत मातीतल्या माणसांच्या जाणीवा अधिक सकसपणे येतात. मनाच्या संवेदना जागवणारी त्यांची कविता आहे. शेती मातीशी तिचं नातं जडलेलं आहे. शेतात राबताना, शेतातून पीक घेताना ,वाफ्यातून रोप उगवताना त्यांची कविता कळत न कळत उगवून येते. कागदावर उतरून शब्दबद्ध होते. वाचक आणि श्रोत्यांच्या मनात ती स्वतःची जागा करते. हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांच्या अनेक कविता भूमिकन्या आणि भूमिपुत्र यांच्या वाट्याला येणारे दुःख मांडताना दिसतात. कवितेतून त्यांच्या दुख:चा जागर मांडताना दिसते . माती इतकंच कवितेशी त्यांचं नातं घट्ट आहे. खरं म्हणजे कल्पना दुधाळ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मातीला समर्पित केलं आहे. त्यांची काव्य लेखना मागची भूमिका मांडतांना त्या लिहितात-
‘ मातीतून चालताना मी मातीच होऊनी जाते
गर्भात हिरवे कोंब मी खुशाल उगवू देते. ’
थोडक्यात त्यांची कविता पिकासारखी, रोपासारखी सहज उगवून येते. त्यांना कवितेसाठी अडून बसायची गरज नाही. झाडाच्या मुळांसारखं त्यांच्या कवितेचं नातं मातीशी घट्ट आहे. त्यामुळे त्यांची कविता शेतीमातीचा वसा घेऊन आली आहे. हा वसा आणि वारसा सांभाळीत अत्यंत सकस कविता त्या लिहित आहे. कवयित्री कल्पना दुधाळ यांचं नातं मातीशी जितकं घट्ट आहे .तेव्हढंच मातीतून उगवणाऱ्या अंकुराशी आहे. तिथल्या पशुपक्ष्यांशी, झाडवेलीशी त्यांचं नातं जडलं आहे. म्हणून त्यांच्या कवितेत ग्रामीण मातीतल्या अनेक प्रतिमा येतात. त्यांच्या कवितेला मातीचा गंध आहे. लोकगीतांची लय आहे. त्यामुळे त्यांची कविता सर्वांनाच आपली वाटते. मनातली अस्वस्थता त्या अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात मांडतात. शेती मातीतल्या अनेक समस्या, अनेक प्रश्न त्यांना सतावतात. त्या समस्यांच्या जाणिवांचा पीळ घेऊन त्यांची कविता येते. बोगस बियाणे, खते, बाजार भाव , दलालांची लुटालुट, उत्पादन खर्च आणि उत्पन्न यातील मोठी तफावत या सर्वांवर त्यांची कविता भाष्य करते. थेट जागतिकरणापर्यंत जाऊन पोहोचते. जीवनाचे अनेक संदर्भ शोधतांना समान दुःखाची जाणीव होत असते. शेतीमध्ये बी पेरलं म्हणजे पीक उगवतं. असं असलं तरी बऱ्याच वेळा ते उगवतांना अनेक प्रश्न घेऊन येतं. अनेक समस्या निर्माण करतं.त्या वेगळ्या जाणिवेने या सगळ्या घटनांकडे बघतात.त्यामुळे पिकांनी सोबत आणलेल्या जखमा त्यांना जाणवतात.त्यांची कविता त्यावर शेट टोकदार भाष्य करते.आतलं आणि बाहेरचं माणसाचं जग बदललं पाहिजे. असं त्यांना सतत वाटतं .यंत्रतंत्राने माणसाची नाती तुटत आहेत. माणसं दुरावत आहे. हे सांगून शेतातल्या झाडांच्या फांदीपासून ते जागतिकीकरणाच्या मंदीपर्यंत त्यांची कविता मजल मारते. कल्पना दुधाळांच्या विचारांचा परीघ व्यापक आहे. म्हणून त्या सकस काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. जागतिकीकरणाचा शेतीवर, गाव खेड्यांवर, तिथल्या शेतकरी, शेतमजूर , बलुतेदार, लहान मोठे व्यवसायिक या सर्वांवर झालेला परिणाम त्या आपल्या कवितेतून चपखलपणे मांडतात. लोकल ते ग्लोबल सगळा आसमंत व्यापून टाकणारी त्यांची कविता आहे.
स्वातंत्र्यानंतर ‘खेड्याकडे चला’ असे महात्मा गांधींनी म्हटले होते. खेडी समृध्द झाली तर राष्ट्र आपोआप समृध्द होईल. परंतु सत्तापिपासू राजकारण्यांनी गांधीजींच्या ग्रामीण विकासाच्या आराखड्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं. त्याचे वाईट परिणाम ग्रामीण जनता भोगते आहे. गांधीजींचा शेतीतल्या यांत्रिकीकरणाला विरोध होता. त्या विचारांना दुधाळांची कविता दुजोरा देते. महानगर आणि ग्रामीण अशा मानसिकतेतून वेगळ्या वास्तवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. हे मांडताना त्या लिहितात –
‘महानगरीय व्यवस्था माझ्या अस्तित्वाला लाथाडून पुढं जाते
मारक्या म्हशीसारखी अंगावर धावून येते
गुदमरून जातो माझा जीव… मी धावू लागते पुन्हा
रानाच्या … घराच्या ओढीनं.
आता मी पाठवते लेकरांना कॉंन्व्हेंटमध्ये
मी नाही… निदान लेकरं तरी
या महानगरीय व्यवस्थेत उघडी पडू नयेत म्हणून ’
पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील बोरीभडक हे खेडेगाव.या खेडयामधली शेती मातीत राबणारी, काबाडकष्ट करणारी ही कवयित्री. पुण्याच्या महिला महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडते. आणि शेती मातीत काबाडकष्ट करते. शेती मातीत राबतांना ती झाडांची बोलते.पानांची बोलते. झाडाच्या मुळांच्या संवेदना अनुभवते. फळांचा गोडवा अनुभवते. हे तिचं सगळं अनुभवविश्व कवितेच्या रुपानं शब्दांच्या हिरवाईनं नटून कागदावरती येतं. ‘ सीझर कर म्हणतेय माती ’,आणि ‘ धग असतेच आसपास ’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही काव्यसंग्रहाच्या दुस-या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘सिझर कर म्हणतेय माती‘ या कवितासंग्रहाचा मुंबई, सोलापूर, जळगाव,विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.तर ‘धग असतेच आसपास’ या कवितासंग्रहाचा नांदेड,पुणे,कोल्हापूर,अमरावती,मुंबई या विद्यापिठांच्या विविध अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.शैक्षणिक वर्ष जून २०२० पासून इयत्ता बारावीच्या युवकभारती पाठ्यपुस्तकात ‘ रोज मातीत’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कविता लेखनाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात नवी दिल्ली येथील शीला सिद्धांतकर स्मृती सम्मान, नारायण सुर्वे सनद पुरस्कार,राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे. धोंडीराम माने साहित्य पुरस्कार, औरंगाबाद, आशीर्वाद पुरस्कार, मुंबई. कवी कुसुमाग्रज पुरस्कार,नाशिक. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, पिंपरी चिंचवड,अंकुर साहित्य संघाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार, अकोला.,कवयित्री बहिणाई साहित्य पुरस्कार,आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव,.कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार, संगमनेर.आचार्य आनंदऋषीजी साहित्यरत्न पुरस्कार, पिंपरी,विशाखा काव्य पुरस्कार , नाशिक. मुद्रा साहित्य पुरस्कार, जालना,संत नामदेव साहित्य पुरस्कार , बळीवंश पुरस्कार,गावगाडा साहित्य पुरस्कार, वडशिवणे, ता. करमाळा,महाराष्ट्र वन वाहिनीचा सावित्री सन्मान, कै.संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, अहमदनगर,लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार, पांडाणे, नाशिक,यशवंतराव दाते काव्य पुरस्कार वर्धा, जिव्हाळा साहित्य पुरस्कार, पंढरपूर, कवीवर्य रा.ना.पवार साहित्य पुरस्कार, सोलापूर. आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत.
कल्पना दुधाळांच्या कवितेला गावाकडच्या मातीच्या सुख दुख:चा वास आहे. मातीतल्या कणांचा अबीर त्यांच्या कवितेच्या माथ्यावर दरवळतो आहे.बहुआयामी आणि अस्वस्थ करून सोडणारी दुधाळांची कविता प्रत्येकाला संमोहित करते.त्यांच्या कवितांच्या शीर्षकांमध्ये कवितेचा आशय वाचकांना स्पष्टपणे जाणवतो. हेच त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. उदाहरणार्थ – कणसाचे मरण,उत्सव,वाटण्या,पेरते व्हा,गाळ,खोंड,बी,जुनं शिवार,मिरुग,बैल,गोंधळ ,विठोबा,पोशिंदा,आईच्या पदराखाली, ही सगळी शीर्षक मातीचा गंध घेऊन येतात आणि वाचकांच्या मनात दरवळत राहतात.शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानाच्या संदर्भात कल्पना परखड शब्दात लिहिते. तिथल्या व्यवस्थेचे ती पोलखोल करते. अफवा आणि आश्वासनं वा-यासोई सोडून सामान्यांना स्वप्न दाखवली जातात. शेवटी प्रत्यक्ष फायदा मात्र नेटवर्कमधील असलेल्यांचाच होतो.सर्वसामान्य जनता नेहमीच विकासाच्या कव्हरेज क्षेत्राबाहेरच राहते. थोडक्यात ‘ आतले आणि बाहेरचे ’ हा फरक कसा केला जातो. यावर दुधाळ अत्यंत सूचक भाष्य करतात-
‘ धान्यापासून मद्यार्कनिर्मितीची चर्चा
घुमत राहते … रानभर … मनभर…
अनुदानाच्या पुसण्यास सावलीत…
ग्लोबल एरिया नेटवर्कमध्ये
मी मात्र कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर…..’
तरीही शेतीवर,मातीवर शेतक-यांचा दृढ विश्वास आहे. शेती माणसासह भोवतालच्या घटकांना सांभाळते. शेतीची क्षमता आणि व्यापकता दाखवताना त्या लिहितात-
‘ स्क्रीनवर झळकलेले शेतमालाचे बाजारभाव
नुसते वाचून दमडीसुद्धा मिळत नाही
आणि पांढर्यावर काळं करण्यापेक्षा
काळयातून हिरवं पिकवलं
तर निदान पोट तरी भरतं .’
हा सकारात्मक दृढ विश्वास शेतीत राबणाऱ्या तमाम कास्तकारांना कविता देऊन जाते.त्यांची कविता शेतात राबणाऱ्या माणसांना आत्मविश्वास प्रदान करते.कितीही तंत्रज्ञान आलं.ठिबकसिंचन आलं.विविध यंत्र आले. हेल्पलाईन आले.कृषी कॉलसेंटर आले.तरीही शेतकऱ्याला राबावं लागतं.लढावं लागतं. त्याचे प्रश्न सुटत नाही. हे मांडतांना त्या लिहितात-
‘ हे सारं काही हाताशी आलं तरी
लढाई ज्याची त्यालाच लढावी लागते राजा
छातिची ढाल करून …. लढ पठ्या लढ …
नव्या युगाला दाखवून दे
कुणब्याचं ग्लोबल वर्ड’
देशाला स्वातंत्र्य मिळालं. समृद्धी येईल असं स्वप्न पाहिलं. शेतकरी उन्नत होईल असा आशावाद जागवला. परंतु तसं फारसं काही झालं नाही. स्वातंत्र्यानंतर माती आणि माणसांची वाट लावली.यावर भाष्य करताना कल्पना दुधाळ लिहितात.
लाज वाटते आम्ही शेतकरी असण्याची
घोड्यावर बसून दगडाने …….. पुसण्याची
मेंदूतला कीडा सांभाळत
आम्ही अविचारी कसे राहिलो
जग पुढे गेलं …
आम्ही मात्र आऊटडेटेड झालो .
लोकशाहीतील लोकशाहीतील समाजाच्या विकासाच्या विविध टप्प्यांचा विचार करताना शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून झालेल्या आत्महत्यावर कविता भाष्य करते. दशावताराची रुपं घेऊन लुबाडायला टपलेली या व्यवस्थेची टोळधाड डोकंवर करून उभी आहे. आत्महत्या केल्यावर भरीव आर्थिक मदतीच्या घोषणा होतात. दुःखाच्या जाहिराती केल्या जातात. या शेतीप्रधान देशात पाठीचा वाकून विळ्यासारखा वेढा झाला. नाकातोंडात माती गेली. तरी पेरते व्हा.पिकवते व्हा. नाउमेद होऊ नका. मातीवर विश्वास ठेवा. हे सांगतांना त्या लिहितात-
‘लाख बदललं असेल जग
पण भूमीशी बांधलेले आयुष्य
समूळ तोडता येत नाही
साधी स्वतःची सावली चुकवून पळता येत नाही
त्या सावल्यांवर
उजेडा इतका विश्वास ठेवलाय मी.‘
शेतकऱ्याचा मातीशी असलेलं नातं, असलेली नाळ कधीच तोडता येत नाही. याची जाणीव त्यांची कविता करून देते. आणि शेतकरी आश्वासनांच्या घोषणांवर उजेडा इतका विश्वास ठेवत जगत राहतो.एकेकाळची पारंपरिक शेती आज नष्ट होते आहे. पिकांचे देशी वाण केव्हाच नष्ट झाले.आज सर्वत्र संकरीत (हायब्रीड ) बियाणं आलं. पिकांचा कोणताच वाण देशी राहिला नाही.त्यामुळे नव्या वाणांची पीकं सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खतांची मागणी करतात. त्यामुळे शेतीची उपजावू क्षमता कमी होत चालली.या बदलांवर त्यांची कविता उपहासात्मक भाष्य करते. तसेच संकरीत बियाणांच्या विविध वाणांच्या उगवण व इतर क्षमतेवर बोट ठेवतांना दिसते.
‘मी टाकलेली मेथी आणि कोथिंबीर
मागतेय माझ्याकडं युरियाचा खाऊ
आणि लुसलुशीत व्हायचं स्पेअर
रखरखीत झाडाच्या सालीनं
मॉइस्चराइजरचा हट्ट धरलाय
आणि माती अडवून बसलीय
सिझर कर म्हणत….
मी काय करू …?’
असा सवाल पिकासह माती करू लागली. हा सवाल तमाम शेतकरी, कास्तकारांच्या अंतर्मनाचा ठाव घेतो. शेती मातीतलं वास्तव किती बदलत आहे . पिकाच्या पद्धती किती बदलत आहेत. रासायनिक खतांचा आणि औषधांचा किती मोठ्या प्रमाणात वापर होतोय. त्यांच्या दुष्परिणामांची तीव्र जाणीव दुधाळांची कविता अधोरेखित करते.
पिकांवर रासायनिक खतांचा आणि औषधांच्या मा-याचा अतिरेक वापर कधी थांबणार ? प्लास्टि कच-याचं शेतीवर होणारं आक्रमण कधी थांबणार ? एक कृषिकन्या म्हणून त्यांना प्रश्न पडतात, असे नाही तर समस्त राबणा-या शेतकरी बांधवांची कैफियत त्या मांडताना दिसतात. विषारी रासयनिक अन्न खाऊन उद्याच्या माझ्या माता-भगीनीच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांच्या गुणसूत्रांवर परिणाम होणार तर नाही ना…! अशी शंका व्यक्त करताना कल्पना दुधाळ लिहून जातात –
‘ नांगरात…. कुदळीत… खोऱ्यात
दातळात…. अडकणारा शहरी कचरा
जुन्याच सेंद्रिय शेतीची… नवी ओळख
मुळानी केला प्रयत्न ….
मातीपर्यंत पोहोचण्याचा
अन्नद्रव्य शोषण्याचा
मात्र शंकाच वाटते आता मला
गुणसूत्रांतून भलतंच काही निपजण्याची‘
कार्पोरेट जगतातला चंगळवाद खेड्यापाड्यात पोहोचला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची शिकलेली पुढची पिढी चंगळवादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खेड्यापाड्यात आलेल्या बँका, पतसंस्था यांच्याकडून जमिनीवर कर्ज घेणे. कर्जातून गाड्या घेणे. शेतात कष्ट न करता गाड्यातून भटकणे. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने घालणे.शानशोकीपणा करणे.त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊन, पिकें बेबाजारभावाने विकली जात आहेत. कर्जाचे हफ्ते थकत आहे. व्याजाचा बोजा वाढतो आहे. हे सगळं वास्तव गलितगात्र करणारं आहे. त्यांची कैफियत सांगतांना त्या लिहितात-
‘ किती सोप्पंय राजा….
सातबारा लिहून दिला की,
कोणतीही इम्पोर्टेड… नवी कोरी… चार चाकी
दारात उभी राहते…
महागा-मोलाची वस्तू घरात येते
पैशावर नाचता येतं…
सोन्या-चांदीत मढवता येतं….कुणालाही
गुंठामंत्री होऊन मिरवता येतं
पण राजा…. आईचं काळीज मागणाऱ्या व्यवस्थेला
…तू तुझं काळीज काढून देशील ?
तुझंही खरंच म्हणा….
लँडलाईन राहिली कुठ ?’
असा सवाल करून माती आणि मातेच्या हलाखीचे ग्रामीण वास्तव त्यांची कविता चव्हाट्यावर मांडते.आज गावोगाव रस्त्यांच्या कडेने ढाबा आणि बार संस्कृती वाढत आहे.नवी पिढी व्यसनाधीन होत आहे. शेतीकडे दुर्लक्ष होतंय. सहाजिकच पायनी संपल्या. पाठोपाठ एकर गायब झाले. आता शेती बिघ्यात आणि गुंठ्यात शिल्लक राहिली आहे. ही शेतकऱ्यांची होणारी वाताहात या तंत्रज्ञानाचा किंवा विज्ञानयुगाचा शाप म्हणायचा का ? असा प्रश्न सहज मनात येऊन जातो.
कल्पना दुधाळ स्वतःच्या कवितेच्या जन्मकथेवर भाष्य करतात. तिच्या निर्मितीची कथा आपल्या कवितेतून मांडताना ‘ नवं वाण’ या कवितेत त्या लिहितात-
‘मायबाई तुझे शेंडे खूडून खूडून
आंब उरली बोटात
बोट खरबुडी झाली
पण तुझ्या वाढीची ओढ
मला खोडताच येणार नाही
या बोटांची आग आग होऊ दे
चिरा पडून झिनझिनू दे
तुझ्या अंबिचा अंश
माझ्या शब्दात भिनू दे .‘
शब्दांना अंबिचा अंश भिनला तर शब्द बोचतील, भडकतील आणि पेटतील. सर्वांच्याच अंगाची आग बनतील.सर्व कास्तकर आग होऊन पेटले तरच गेंड्याची कातडी पांघरलेल्या व्यवस्थेला शेतक-यांची वेदना कळेल.त्यासाठी त्या अंबिला बोटातून शब्दात उतरण्याची विनंती करतात.रासायनिक विषारी औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतशिवारातील फुलपाखरे, पक्षी त्यांचा मोठा ऱ्हास होत आहे. झाडांच्या निर्मितीप्रक्रियेत फुलांच्या परागीभवनाचा मोठा वाटा असतो. परंतु त्यांचा ऱ्हास होतोय. ते नष्ट झाली तर पिकं येतील का ?. पिकं आली नाही तर माणसाचं भवितव्य काय ? यावर भाष्य करताना त्या लिहितात-
‘ या रानातलं शेवटचं पाखरू तहानेच्या मागे जाताना
शेवटचं हिरवं पान गळून पडताना
जीवामागून जीव नामशेष होताना
वाऱ्याचा आक्रोश ऐकतांना
माणसांची चीट पाखरं
क्षितीजाच्या वळचणीला भिरभिरताना
मुळाचं वाळलेलं जाळ पेलणारी झाडं बघताना
मृगजळाला डोळे भिडवतांना
श्वासांची लाहीलाही होताना
नव्या नव्या विषाणूशी लढताना
सुखानं जगण्याची दारं बंद झाल्यावर आपण म्हणतोय खिन्नपणे
या विपरीतात जन्मच देऊ नये माणसाने माणसाला ‘.
जेव्हा एखादी गोष्ट नष्ट होते. तिचा भूतकाळ जिवंत असतो. तिचं वैभव आठवणीतून माणसाला सतावत राहतं.या महागाईच्या काळात सर्वांना जगवणारी,पालनपोषण करणारी माती अर्थात शेती आम्ही गमावून बसलो.भूमिहीन झालो.तर उद्या आमच्या मनाची अवस्था काय असेल ? हे सगळं सहन होईल का ? . त्यावर भाष्य करताना दुधाळ लिहितात-
‘पोट भरण्यासाठी निघून गेलेले
भुकेल्या पोटाने माघारी फिरलेले
त्या शेतापर्यंत पोचण्याआधीच भुकेने मेलेले
हे दिवस पचवून जगलो वाचलो
तर माणसाने माणसाला सांगाव्यात
अशा शेतांच्या गोष्टी शेतांना सांगताना.’
थोडक्यात कल्पना दुधाळांची कविता ही मातीतल्या माणसांची नुसती कैफियत मांडत नाही तर त्यांना लढण्याचं बळ देते. जगण्याचं भान देते. शेतीच्या अर्थशास्त्राचं गणित मांडते. मातीचं हिरवंपण गोंदायला सांगते.व्यवस्थेचं मुजोर तण निंदायला सांगते. मातीचा संसार सांदायला सांगते आणि मातीत नांदायलाही सांगते. इतकंच नव्हे तर मोठा आत्मविश्वास देत काळजावर झेंडा ठोकून लढायला सांगते. शेतक-यांच्या आत्महत्त्या, चाकरमान्या शिक्षितांच्या बेगडीपणाच्या बुरख्याला घात घालून फाडत जाते.लहानचं मोठं केलेल्या,वृध्द आईवडीलांना सोडून गेलेल्या, उच्च शिक्षित म्हणवणा-या नव्या पिढीला कर्तव्याची जाणीव करून द्यायला त्या विसरत नाही.
शेवटचं हे मागणं आता … जन्माचं देणं देऊन जा
मांडीवर डोकं घेऊन ….. घोटभर पाणी पाजून जा .
अशी आर्तता त्यांची कविता व्यक्त करते.कल्पना दुधाळांची कविता स्त्री,पुरुष,शेती,माती, पशु-पक्षी,कृमी,कीटक, यंत्र,तंत्र,रूढी-परंपरा,सण-उत्सव,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता,शहरीकरण,दारिद्र्य,निर्यातधोरण,प्लास्टिक,जागतिकीकरण, चंगळवाद अशा जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करून जाते. भविष्यात कल्पनाचं कल्पना विश्व अधिक व्यापक व्होवो.विचार आणि चिंतनाच्या सेंद्रिय खतावर तिची कविता बोरी भडकच्या निर्मळ मातीतल्या पिकांसारखी,पिकांच्या सेंद्रिय वाणासारखी दिवसेंदिवस बहरत जावो. त्यांच्या कविता लेखनाच्या पुढील प्रवासाला खूप शुभेच्छा.
लेखकाचा संपर्क – इमेल – Laxmanmahadik.pb@gmail.com
कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या आवाजात त्यांचीच बाया ही कविता…नक्की ऐका
छान????????????????
खुप छान ।
अतिशय छान व सोप्या शब्दात स्पष्टीकरण केले.
कवयित्री कल्पना दुधाळ व त्यांची कविता फक्त बारावी पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहिली नाही तर समाजमनात स्थान निर्माण केले आहे.
बहिणाबाई चौधरी आणि सरोजिनी बाबर यांच्या लेखी आयटी युगातही जिवंत आहे ही अभिमानाची बाब
शेतकरी कष्टकरीमहिलाचं गामिण जीवन कवितेत माडणारी कवयित्री.
छानच लिहिलंय सरजी
कल्पना दुधाळ यांच्या कवितेचे भावविश्व आपण समर्पक शब्दात शब्दबद्ध केले आहे.शेतिमातीतले हुंकार टिपले आहे.आपली ही शब्ददिंडी पुढे पुढे जात राहो .सर आपणास मनापासून शुभेच्छा.
Sundar rasgrahan…kavitahi sundar…
शेती,मातीवर कु़णब्याची कविता लिहणा-या व जगणाऱ्या कविने कल्पना दुधाळ यांच्या साहित्याचा खूप छान परिचय करून दिला आहे.बदलत्या ग्रामीण जीवनाच्या वेदना या दोहोंच्या ही समसमान असल्याने कदाचित योग्य शब्दात त्या सहज प्रकट होत गेल्या आहेत.
जगाचा पोशिंदा आपला बळीराजा.त्याची काळी आई,जिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम आहे.तिची सेवा करताना तो थकत नाही.कारण स्वत:चे पोट भरण्याबरोबर जगाच्या पोटाची चिंता करणारा हा पोशिंदा….
याला सोसावे लागणारे हाल कवयित्री कल्पना दुधाळ यांनी सक्षमपणे मांडली.’सिझर’हा शब्द मातीशी जोडून मातीची व्यथा मांडून शेतकऱ्यांना कशाकशाचा त्रास सोसावा लागतो हे आपल्या कवितेतून मांडले आहे.’माती संवाद साधते’ हेच मुळात हृदयाला भिडणारे आहे..
ग्रामीण कवयित्री कल्पना ताईंच्या कवितेचे समीक्षण कवी ,लेखक श्री लक्ष्मण महाडिक यांनी खूप छान पद्धतीने केले आहे.कवितासंग्रहातील कवितांची ओळख करुन देताना कोणत्या भावनांची दाटी कवयित्रीच्या मनात मातीशी बोलताना दाटली.तो भावधागा नेमका महाडिक सर आपण वाचकांच्या लक्षात आणून दिला आहे