‘ अस्तित्व नाकारलेल्या श्वासांची आर्तता सशक्तपणे
कवितेतून मांडणारा कवी ’ : शशिकांत हिंगोणेकर.
अस्तित्व नाकारलेल्या श्वासांची आर्तता सशक्तपणे कवितेतून मांडणारा कवी अशी शशिकांत हिंगोणेकर यांची ओळख करुन देता येईल. त्यांच्या कविता म्हणजे स्वत:च्या आणि अवतीभोवतीच्या समाजव्यवस्थेतील अनेक लहान मोठ्या जीवनानुभवांवर केलेलं भाष्य आहे.
- प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आणि लेखक आहेत)
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी कविता बदलत गेली.याच काळात कवितेने वेगळे वळण घेतले. मर्ढेकरांनी नवकाव्याचे एक युग निर्माण केले. त्यामुळे प्रतिमा सृष्टीला कवितेत महत्त्वाचे स्थान लाभले.वृत्तालंकाराच्या जोखडातून कविता मुक्त झाली. त्यामुळे अलीकडे कविता मुक्तछंदात वावरतांना दिसते. त्यामुळेच अलीकडची कविता अधिक समाजाभिमुख होत चालली आहे.सामाजिक जाणिवांची कविता समाजजीवनाला गती देते. सामाजिक जाणिवांच्या विविध प्रश्नाला हात घालते. फुले-आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन साठोत्तरी काळात साहित्य, समाज, संस्कृती, नकार, विद्रोह, आत्मभान, बांधिलकी या घटकांना कवेत घेत जागृत संवेदनशील मनोवृतीतून दलित कविता लिहिली जावू लागली. दलित कविता साहित्यप्रवाहात सामीलझाल्याने मराठी साहित्याचे दालन ख-या अर्थाने समृध्द होत गेले. कारण दलित कविता स्वत:ची काही लेखनमूल्ये घेऊन आली.त्यामुळे दलित कवितेतील मूल्याधिष्ठित्तेमुळे तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ही कविता महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून लिहिली जावू लागली. सामान्यातील सामान्य माणसाच्या व्यथा,वेदनेशी तिची नाळ बांधली गेली.शतकानुशतके गुलामीत जगलेल्या माणसाचा हुंकार आणि उद्गार घेऊन दलित कविता आली. त्यामुळे दलित कविता वेगाने समाजाभिमुख झाली. तशीच ती मराठी कवितेतील मुख्यप्रवाह ठरली. एवढेच नाही तर मराठी कवितेला समाजाभिमुख करण्यास ती तेवढीच पूरक ठरली.शिक्षणाचा परीस स्पर्श होऊ लागल्याने या विचारधारेवर निष्ठा ठेवून ग्रामीण, शहरी भागातून अनेक कवी लिहिते झाले. आजच्या या भागात फुले-आंबेडकर विचारधारेवर निष्ठापर्वक कविता लेखन करणारा कवी घेऊन येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर येथील विभागीय मंडळाचे सचिव पदावरून अलीकडेच सेवानिवृत्त झालेले, बहिणाबाईंच्या साहित्याचा समृध्द वारसा लाभलेल्या खान्देशाच्या मातीतला कवी शशिकांत हिंगोणेकर जळगावमधून सहभागी होत आहेत.
ज्यांची कविता अधूनमधून क्षुब्ध व उत्तेजित होत असली तरी संयम आणि शांती ही मूळप्रकृती सोडत नाही. सभोवतालच्या अस्तित्व नाकारलेल्या श्वासांची आर्तता आपल्या कवितेतून मांडणारा कवी म्हणजे शशिकांत हिंगोणेकर. आयुष्यातील वळणं म्हणजे जीवनातील सामाजिक परिवर्तन. अशा सामाजिक परिवर्तनाचा कवीच्या लेखनावर परिणाम होत असतो. त्यातून त्यांच्या संवेदना बदलत जातात. त्यानुसार कलाकृती बदलत जाते. कवी ज्या समाजात जन्माला येतो, ज्या परिसरात जन्म घेतो. तिथल्या सामाजिक रूढी, परंपरा व धर्मकल्पना, आचार-विचार, तिथले संकेत ,शिष्टाचार एकूण समाजाची जीवन पद्धती या सर्वांचा जगण्यावर तसाच विचारांवर परिणाम होत असतो. पुढे हाच परिणाम कवीच्या लेखनावर होत असतो. हे सगळं कवीच्या साहित्यकृतीतून शब्दबद्ध होत असते. समाजात कवीची एक व्यक्ती म्हणून जडणघडण होते. तेव्हा सामाजिक व्यवस्थांचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो. थोडक्यात समाजातली माणसं, समाजातले प्रश्न, तिथली जीवनपद्धती, जीवन पद्धतीतील संस्कार, त्याचे कुटुंब, रीतिरिवाज, परस्परांशी असलेले संबंध या सर्वांचे अवलोकन होत जाते . त्यातून मनात निर्माण झालेली आंदोलने किंवा संघर्ष चिंतनातून मंथन होऊन कवितेच्या रूपाने कवी शब्दबद्ध होत असतो. कवीच्या कवितेला सुखदुःखाची किनार असतेच, तसाच आनंदाचा गंधही असू शकतो.कवी लिहितो म्हणजे तो एक स्वतःची भूमिका सिद्ध करतो. ज्या भूमिकेतून त्याला सामाजिक प्रश्न मांडायचे असतात, त्या भूमिकेवर कवी स्वार होतो. त्या जाणिवेतून त्याच्या कवितांमधून तो स्वत:ला मांडत असतो. कवीच्या कवितेतून त्याच्या मनाचा आत्मविष्कार जन्म घेतो.कारण कवितेचा संबंध भावनांशी असतो, तर भावनांचा संबंध हृदयाशी असतो. याच सहसंबंधातून कविता लिहिणारे कवी शशिकांत हिंगोणेकर होत.
आजपर्यंत शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाची शीर्षकेच त्यांच्या लेखनाची विचारधारा स्पष्ट करतात. ‘ युद्ध सुरू आहे, अंतर्भेदी, अजुनही, कवितेचे दिवस, बेट बंद भावनेचे, वर्तमान, अस्वस्थ, प्रस्फुरणे, नवे स्वागत, छलचक्र, दस्तक, बंद दरवाजा, मोकळे आकाश , ऋतुपर्व, आणि ऋतूंची काळी फुले, असे चौदा कवितासंग्रह प्रकाशित आहे. ‘युध्द जारी है’, ‘कश्मकश’ हे त्यांचे हिंदी भाषेत तर ‘ An lsle of Pent of’Emotion, इंग्रजी भाषेत अनुवादित झालेले काव्यसंग्रह आहेत. कवी शशिकांत हिंगोणेकर म्हणजे कवितेच्या क्षेत्रामधलं एक वलयांकित नाव. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१७ चा ‘कविवर्य केशवसुत काव्य पुरस्कार’ त्यांच्या ‘ ऋतूपर्व ’ काव्यसंग्रहाला प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे कविवर्य ना.घ. देशपांडे काव्यपुरस्कार,बुलढाणा. अस्मितादर्श वाड्मय पुरस्कार,औरंगाबाद. तापी-पूर्णा साहित्य पुरस्कार,मुक्ताई नगर.कवी महर्षी वाल्मिकी काव्यपुरस्कार, जळगाव. कवी के.नारखेडे काव्यपुरस्कार, भुसावळ. कवी अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर. अंकुर काव्यपुरस्कार, अकोला. स्वर्गीय सुशीला राम कदम काव्यपुरस्कार, वरणगाव. बालकवी काव्यपुरस्कार, धरणगाव. आणि श्री.दलूभाऊ राज्यस्तरीय सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार, जळगाव. अशा विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहे. विशेष म्हणजे पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये ‘ बेट बंद भावनेचे ’ या काव्यसंग्रहाचा तर अमरावती विद्यापीठ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. येथे काही कवितांचा एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठात बी.ए.च्या प्रथम वर्षाला त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
शशिकांत हिंगोणेकर यांचा जन्म १२ एप्रिल १९६१ सालचा.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी शासकीय सेवेत नोकरीचा आरंभ केला.महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, प्राचार्य, प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शेवटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण , लातूर विभागाच्या विभागीय सचिव पदावरून नुकतेच वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. शासकीय सेवेत असताना कवितेकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. कारण कविता ही त्यांच्या जगण्याचा श्वास होती. शशिकांत हिंगोणेकर यांच्या कविता म्हणजे स्वत:च्या आणि अवतीभोवतीच्या समाजव्यवस्थेतील अनेक लहान मोठ्या जीवनानुभवांवर केलेलं भाष्य आहे. विद्रोह आणि नकार या मूलभूत प्रेरणा त्यांच्या कवितेच्या पानापानात ठळकपणे जाणवतात.आपल्या कवितेत ते वेळोवेळी समाजव्यवस्थेतील कलुषित अशा सनातनी प्रवृत्तीचा रोखठोकपणे समाचारही घेताना दिसतात. ‘ नवे स्वगत ’ मध्ये शशिकांत हिंगोणेकर आपल्या काव्य लेखनाच्या प्रयोजनाबद्दल लिहितात –
‘ शब्द निघाले आहेत युध्दाला
शब्दांना जरा भेटून जा
शब्दांनी उपासल्या आहेत तलवारी
त्यांना जरा धार लावून जा.
माझे शब्द भुकेने तडफडणा-या
अस्तित्व नाकारलेल्या
श्वासांचे होताहेत
अंतिम निर्णायक शस्त्र आणि अस्त्र. ’
अत्यंत मार्मिकपणे शब्दांच्या माध्यमातून आपल्या कवितेची, अर्थात विचारांची भूमिका स्पष्ट ते करतात. खरे म्हणजे सामाजिक विद्रोहाच्या पाण्यावर त्यांची कविता वाढते आहे.सामाजिक उत्थानाच्या, परिवर्तनाच्या दिंडीत त्यांची कविता पताका होऊन तळपते आहे. त्यांची कविता समाज व्यवस्थेतील दुष्ट प्रवृत्तीला सुरुंग लावून उडवून देण्याची भाषा करते. तर कधीकधी रणांगणात उतरून बुरखे फाडून चक्रव्यूह भेदण्याचे धाडस त्यांची कविता करते. इतकेच नव्हे तर अन्यायाला विरोध करण्याची भाषा त्यांची कविता करते. ते ‘ सुरुंग ’ कवितेत लिहितात-
‘ त्यांनी काही अटी ठेवल्या माझ्यासमोर
सूर्योदयाच्या वेळी डोळे बांधायचे….
म्हणजे डोळे फोडणार नाही .
भर दुपारी अनवानी चालायचे….
म्हणजे पाय तोडणार नाही.
मध्यरात्रीला घरदार सोडायचे…..
म्हणजे घराला आग लावणार नाही .
या सा-या अटींनीच तर सुरुंग पेटला आहे.
माझ्या काळजाच्या कोठारात…. ! ’
अशा अटी घालणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्ध ते कवितेतून सुरुंग होऊन पेटून उठतात. सहज सोप्या शब्दात मनाचा हुंकार, आक्रंदन व्यक्त करतात. त्यांच्या कवितेचं हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांची कविता म्हणजे जगण्याच्या विविध स्तरातील अंत:स्वर होय.त्यांची कविता म्हणजे अनुभूतीच्या विस्मृतींचे खंदक फोडून आत्मभानाशी संवाद करीत, स्वत्वाचा शिलालेख काळावर कोरीत जाणारी कविता आहे. शोषक आणि शोषित यांच्या अंत:संघर्षाची कविता आहे. त्यांची कविता अंधार कापून प्रकाशाचा वेध घेणारी उर्जस्वल कविता आहे. त्यांच्या कवितेला स्वतंत्र मूल्यभान आहे.ते भान त्यांनी जाणीवपूर्वक जपले आहे. शशिकांत हिंगोणेकर हे अंतर्मुख प्रवृत्तीचे कवी आहेत.त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे मिताक्षरी भाषा आणि अभिव्यक्तिमध्ये असणारी सहजता. ती सहजता वाचकाच्या मनाला मोहून टाकते. अधूनमधून त्यांची कविता उत्तेजित होताना दिसते. अंगार ओकताना दिसते. सुरुंग पेटवताना दिसते. एल्गार पुकारताना दिसते. असे असले तरी संयम आणि शांती ही तिची मूळ प्रवृत्ती पदोपदी जाणवत राहते. तिच्यात बुध्दाची करुणा आणि शांती डोकावते. म्हणून त्यांची कविता ही अस्तित्व नाकारलेल्या श्वासांची तुषार्त कविता आहे. समाज मनाच्या आतल्या वेदनेची ठसठस मांडणारी त्यांची कविता आहे. जगण्यातील तुटलेपण, एकाकीपण सांधणारी,जोडणारी कविता आहे. त्यांची कविता जितकी विद्रोहाची भाषा करते. वर म्ह्टल्याप्रमाणे तितकीच ती बुध्दाच्या संयम आणि शांतीचा पुरस्कार करते. एक मात्र नक्की की त्यांची कविता त्यांच्या जगण्याचा श्वास घेऊन येते. आणि वाचकांचा श्वास होऊन जाते. हे अधोरेखित केले पाहिजे. शशिकांत हिंगोणेकर आपल्या दुःखाची गाथा मांडताना लिहितात-
‘ कुणालाही सांगू शकत नाहीत मी ही अनाम दुःखाची गाथा
तरीही माझ्या कवितेत एक सारखी ठसते आठवणींची काळी खपली
एक आर्त पाऊस सारखा कोसळतोय मनाच्या पडीक जमिनीवर
काहीही उगवू शकत नाही ओल्या दुष्काळाचे सावट पसरले
सभोवती चौफेर दूर दूर.’
युगानुयुगे जातीयतेच्या जखमांची काळी खपली अजूनही ठसठसते आहे. विचारांचा आर्त पाऊस आजही कोसळतो आहे. मनं मात्र पडीक जमिनीसारखी झाली आहे. काही नवीन उगण्याची शक्यता आता तिच्यात उरली नसल्याची वर्तमान कालीन सामाजिक खंत कवी व्यक्त करतो. आणि नव्या पिढीच्या कार्यकर्तृत्वावर बोट ठेवतो.त्याचबरोबर त्यांची कविता अंधाराचे गाणे उजेडाच्या हाती देऊन जाते.
सभोवतालचं सकलसमांतर असणारं वास्तव कवी मनाला उध्वस्त करत राहतं. ही उध्वस्तता मनात धुनीसारखी पेटत राहते. तिच्या आवेगाने कवी आतून पेटता होतो … बोलता होतो…. आणि लिहिता होतो.
‘माझा उजेड
ज्या कैदखान्यात कोंडलाय
ते कैदखाने
उद्ध्वस्त करायचेत मला.’
अशी भिष्मप्रतिज्ञा करून ही युगानुयुगाची चाललेली मुस्कटदाबी आता थांबली पाहिजे. हे सारं गुलामीचं जगणं थांबलं पाहिजे. याकरिता गुलामीच्या उगमस्थानीच घाव घालण्याची भाषा कवी करतांना दिसतो. त्यासाठीची सिद्धता करताना हिंगोणेकर लिहितात-
‘ माझी अंतहीन दु:खे …. मी दडवली आहेत
माझ्या काळजाच्या कोठारात
सुरुंगासारखी .
त्यांचा स्फोट आहे … शब्दांच्या ही पलीकडचा
म्हणून मला आता नेहमी
सशस्त्र राहावं लागेल.’
भोवतालची सामाजिक विषमता, भुकेची भयावहकता, गुलामीचे साखळदंड,अन्यायाचे आसूड, फितुरांचा शेजार या सा-या प्रश्नांच्या गर्तेतून वाटचाल करताना कुणी कुणावर किती विश्वास ठेवायचा ..? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण पाऊस पडायला लागला की , आपपापल्या छत्र्या उघडणारे … मतांचा लिलाव करून चलनी उकिरड्यावर लोळत पडणारे पावलोपावली आहेत. यातून मुक्तस्वातंत्र्याच्या पाऊलवाटेने कसे जाता येणार..? आपले सारे मनसुबे जमीनदोस्त करण्यासाठी सा-या यंत्रणा सज्ज आहेत. थोडीशी चूक झालीच तर …. शिकार ठरलेली.या सा-या दिव्यातून वाटचाल करताना कवी दृढ विश्वासही देऊन जातो.
‘ आता दरवाजे उघडतील
आणि आपण मिसळून जाऊ
समतेच्या प्रवाहात
याची वाट पाहण्यात
काहीच अर्थ नाही .
त्यांचे हात गुंतले आहेत
पुन्हा नव्या
अंधार कोठड्यांच्या निर्मितीतीत
त्या आधी आपल्याला
हे बंद दरवाजे
उखडून फेकले पाहिजे. ’
तरी ही समाजातील भयावहकता, सामाजिक विषमतेची दरी कधी मिटणार ? हा प्रश्न कवीमनाला सतावत राहतो. मानवी मनाच्या तळाशी असलेला न विझणारा विद्वेषाचा जाळ किती दिवस धगधगता राहणार आहे. प्रस्थापित व्यवस्थेचे काळेकुट्ट ढग आपली रुजू पाहणारी स्वप्न चिरडून टाकत असतांना, भविष्याचा वेध घेणारे मन मात्र खचून जात नाही. याउलट अंधारवाटा तुडवून प्रकाशाचा वेध घेण्याची भाषा कवी करतो. आपल्या ध्येयांच्या वाटा कोणताच ऋतू थांबू शकणार नाही. हा कविमनाचा आशावाद अत्यंत प्रबळ ठरतो.
‘ मी उलथून टाकीन हे प्रश्नांचे पहाड
थोडा धीर धरा
हळू हळू मी होतोय अधिक गंभीर
या व्यवस्थेला कायमची मूठमाती देण्यासाठी
नव्या वळणावर आलोय मी… माझे समग्र आयुष्य घेऊन ’
ही व्यवस्था उलथून टाकण्याची भाषा त्यांची कविता करते. कविता जर सोबतीला नसती तर कदाचित कवी व्यवस्थित स्वत:च्या पायावर उभा राहिला नसता. नव्या वळणावर येण्यासाठी कवितेने जगण्याची दिशा दिली. भान दिले. ‘नव्या वळणावर’ हे शब्द कवी आणि कवितेचे समृध्दपण सिध्द करतात. हिंगोणेकर आपल्या कवितेबद्दल सांगतात –‘कवितेनं दिलेय पुन्हा नवे श्वास मला
जगू लागलोय मी पुन्हा .
शब्दांचे नवे अरण्य पुन्हा उगवू लागले आहेत
पुन्हा फुलांचे, चंद्र-तारकांचे घर-अंगण खुणवू लागले आहे
मी लिहितोय पुन्हा प्रलयानंतरचे आयुष्य माझे
पुन्हा नव्याने . ’
अशी कवितेवरची निष्ठा प्रांजळपणे कवी कवितेतून व्यक्त करतो. माणसाचे आयुष्य म्हणजे अनेक चढ-उतार . कवी हा संवेदनशील मनाचा असल्याने स्वतःच्या आयुष्यातील अनेक अनुभव ,अनेक चढ-उतार, त्या सगळ्या चढ उतारांवर झालेली मनाची हतबलता, मनाची स्थिती, सगळ्यांचे कंगोरे आपल्या कवितेतून कवी टिपत येतोय. त्यासाठी कवीनं हृदय सदैव मोकळं ठेवलं असल्याची ग्वाही कवी हिंगोणेकर वाचकाला देऊन जातात. आजच्या वर्तमानात आपण आजूनही गुदमरतो आहे. मुक्त श्वास घेता येत नाही. हे मांडताना ते लिहितात –
रोजच्या जगण्याच्या कोलाहलात
असतोच कुठे जिवंत आपण
गुदमरत राहतो आतल्या आत
आणि जळता जळता
विझून जातो तळघरात .
पण कुठल्याही क्षणी
उडून जाईल काळजातले फुलपाखरू
काही सांगता येत नाही
मी जे जगलेले लिहितोय
उद्या हे असेच शाश्वत राहील का ?
असा एक वैश्विक प्रश्न,शंका त्यांची कविता व्यक्त करते.
शशिकांत हिंगोणेकरांच्या कवितेत सामाजिक वेदना जशी ठसठस करते. तशीच ते ऋतुपर्वातून प्रेमाची विफलता आधोरेखीत करून जातात.तशीच अभिव्यक्तीतील अपरिहार्यता मांडून जातात. ‘वर्तमान’मधून वर्णवाद्यांनी जातीयतेच्या नावाखाली केलेल्या अमानुष छळाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’ नवे स्वगत ’ मधून नव्या शतकाच्या पडझडीचे वास्तव चत्र रेखाटत दुख:चा अंधार पेलून उजेडाच्या दिशेने वाटचाल करण्याचा मूलमंत्र त्यांची कविता देवून जाते.तर ‘ कवितेचे दिवस ’ मधून त्यांची कविता काव्यानुभवाचा कलात्मक वेध घेतांना दिसते. त्याचबरोबर कलुषित सनातनी प्रवृत्तीचा रोखठोकपणे समाचार घेतांना दिसते. एकूणच आत्मभान आणि आश्वासकता हा शशिकांत हिगोणेकरांच्या कवितेचा आशयधर्म आहे.हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांच्या कवितेतील प्रतिमा सृष्टी अत्यंत व्यापक आहे. प्रतिमा नेहमी भावनांचा उत्कर्ष साधण्यासाठी, वस्तूचे रूप, गुण, क्रिया यांचा उत्कट अनुभव आणून देण्यासाठी होतो. तसेच कवीच्या अंतर्गत भावनांना मूर्त स्वरूपात व्यक्त होण्यासाठी होतो.कवीच्या अनुभवाचे प्रभावी सादरीकरण प्रतिमा करतात. म्हणून कवितेत प्रतिमांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. कवीच्या अनुभव विश्वाचे व्यापकपण जेवढे मोठे तेवढी त्याची प्रतिमासृष्टीही व्यापक आणि मोठी असू शकते. त्यावर कवितेचं मोठेपण ठरत असते.
कवी शशिकांत हिगोणेकरांच्या कविता इथल्या मुजोर व्यवस्थेच्या बंद दरवाज्यावर आपल्या शब्दांच्या वज्रमुठींचा घणाघाती दस्तक देत … छलचक्राचा वेध घेत …ऋतू पर्वातील मोकळ्या आकाशात …. ऋतूंची काळी फुले पायदळी तुडवीत … अस्वस्थ मनातून अस्वस्थ प्रस्फुरणाचे नवे स्वगत आळवीत …. बंद भावनांच्या बेटावर कवितेचे दिवस मोजत…. अंतर्भेदी वर्तमानाला अजूनही युध्द सुरु आहे. अशा स्पष्ट शब्दात जाणीव द्यायला मागेपुढे पाहत नाही. शशिकांत हिंगोणेकरांची शब्दसृष्टी ही अधिक बहरत जावो. त्यांच्या पुढील काव्य लेखनाला खूप सा-या शुभेच्छा.
(लेखकाशी संपर्क – मो. 9422757523 ई मेल – Laxmanmahadik.pb@gmail.com )
नक्की ऐका, कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या आवाजात त्यांचीच कविता
खूप छान लिहिलंय सर.
मनापासून अभिनंदन हिंगोणेकर सर
कवितेचे यथोचित आवलोकन आणि विश्लेषण.मुक्तछंद हा सामाजिक जाणीवेच्या कवितेचा प्राण आहे.त्यांच्या जगण्याचे आयाम एवढे उतुंग आणि ओबडधोबड आहेत,की कोणत्याही आखिव घोटीव नियमावलीत अस्तित्व फुलून येत नाही.तीचा मूलभूत रांगडेपणा काहीही लपवत नाही.तिला सदैव मुक्ततेचा ध्यास राहिला आहे.त्यादृष्टीने हिंगोणेकरांच्या कवितेकडे पाहिले पाहिजे .महाडीकांनी कवितेची योग्य अशी नोंद घेतली आहे.
श्री. शशीकांत हिंगोणेकर यांच्या आत्मलक्षी व समुह लक्षी काव्य लेखना चा श्री लक्ष्मण महाडीक यांनी घेतलेला धांडोळा
वाचताना , अस्वस्थ करणारे अनेक थांबे आहेत.
आकृती बंधाचा मोह बाजुला करत ,प्रेमाची हळूवार झुळूक देणारे ओयासिस ही आहेत.
उत्कट कवितांंचे उत्कट रसग्रहण.
दोघांचेही मनस्वी अभिनंदन.
खूप सुंदर परीचय.
सर एका कविने दुसऱ्या कविच्या साहित्याचा परिचय करून देणे म्हणजे दुग्धशर्करा योग आपण लेखन केलेला एक -एक शब्द म्हणजे समुद्रातून एक -एक मोती वेचून माला तयार करण्यासारखे अतिशय सुंदर व उच्च प्रतिच्या शब्दालंकारांचा जो साज आपण चढवता त्त्याचे वर्णन करायला शब्द अपूरे पडावे.
सलाम आपल्या लेखन शैलीला आणि अभिनंदन!
कवी हा समाजाच्या ज्वलंत प्रश्न हाताळणारा,सजग समाज निर्मितीत बांधिलकी जोपासणारा असला म्हणजे समाजाला जागृत करणे सोपे जाते,मा. हिंगोणेकर यांच्या कवितेतून हेच कार्य पर पडले आहे,त्याच्या कवितेचा सुर सौम्य असला तरी त्यातील दाहकता कमी नाही.शब्दांचे अचूक बाण भल्या भल्यांना घायाळ करणारे आहेत.
सरांच्या कविता खूपच सुंदर असतात
नमस्कार सर,
आपल्या लेखातील प्रत्येक शब्द वाचकाच्या मनाची पकड घेणारा आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचल्याशिवाय चैन पडत नाही.तुमची शब्द रचना इतकी अप्रतिम आहे…त्याबद्दल सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत…हींगोनेकर सरांचा जीवनप्रवास,त्यांना मिळालेले पुरस्कार,वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरी करता करता ज्याच्याशी नाळ जोडली होती ते म्हणजे च काव्य या सगळ्याची सविस्तर मांडणी आपण केली आहे. हिंगोणेकर सरांची “सुरुंग”कविता मनाला अस्वस्थ करणारी आहे….
तुमच्या लेखणीला माझा सलाम!!!
आदरणीय महाडिक सरांनी आदरणीय हिंगोणेकर सरांच्या साहित्यप्रवासाचा विशेषतः कवितेच्या बाबतीत घेतलेला आढावा अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी आहे.
हिंगोणेकर सरांची कविता ही ताकदीची कविता आहे , वास्तवदर्शी विचारप्रवृत्त करणारी कविता आहे जी समकालीन महत्वपूर्ण आहे. पुढील लेखनास अनंत सदिच्छा!
आदरणीय साहेबांनी प्रशासनात राहून कविता लिहण्यासाठी रात्र रात्र जागून काढल्या. अतिशय सुंदर उत्तम भावपूर्ण लेखन केले आहे.
खूपच छान लिहिलंय सर !!