कोरड्या नक्षत्रातून बरसणारं आभाळ –प्रकाश होळकर
‘ हुंकार आणि वेदनेचा ओमकार असते …कविता
मनाच्या तळाशी चालणाऱ्या कोलाहलाची अभिव्यक्ती असते …कविता
काळजातून बाहेर पडणारा ,घुटमळणारा श्वास असते… कविता
इतकंच काय अर्थगर्भ विचारांचे आशय संपन्न रूप म्हणजे …. कविता
संवेदनेचा तर काळजातल्या शब्दानी बांधलेलं घर असते … कविता
वेदनेची जखम असते … कविता.
खरं तर कविता म्हणजे काय असते. कविता असते उस्फूर्त ….भावनांचा उद्रेक
कविता असते कवीच्या हृदयातील वादळ झेलणारी … शक्ती .
प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक प्रसिद्ध कवी आहेत)
कवीच्या मनाचा प्रतिध्वनी त्याच्या कवितेतून ध्वनित होतो . कविता हेच कविचं जगणं असतं. कविताच कविच्या जगण्याचा ध्यास असतो . कवीच्या अनुभूतीचं विशुद्ध रूप विविध प्रतिमामधून कवितेला अधिक सजीवंत करते. कविता सामाजिक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर देते. अस्वस्थ मनाला उभारी देते. कवितेचं सामर्थ्य हे कवितेच्या विषयात,आशयात तर असतंच पण तो विषय आणि आशय व्यक्त करण्याच्या कविच्या समृध्द अनुभव विश्वावर ज्यास्त अवलंबून असते. कवीचं अनुभवविश्व जितकं व्यापक तितकी त्याची कविता वाचकाच्या काळजात घर करून राहते. माणसाच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य कवितेमध्ये आहे.विवेकसिंधूपासून ते ज्ञानदेव तुकारामासह सर्व संतानी अभिव्यक्तिसाठी कवितेशी जवळीक केली.थोडक्यात मराठी साहित्यात कविता प्रथम आली .नंतर गद्य व इतर साहित्य प्रकार आले. थोडक्यात मराठी साहित्यात कविता आरंभापासून प्रकर्षांने लिहिली गेली.
मराठी कवितेच्या प्रत्येक कालखंडात चांगले कवी आपल्या साहित्यकृतींनी पुढे आले. आजही मराठी कविता अतिशय ताकदीने लिहिली जाते आहे .अशा कवींचा आपण या सदरातून प्रत्येक आठवड्यात एका कवीचा परिचय करून घेणार आहोत.त्याचप्रमाणे त्याच्या कवितांचा आस्वादही घेणार आहोत .
त्यात ग्रामीण,आदिवासी,दलित ,नागर अशा सर्व कवींना ‘कवी आणि कविता’ या सदरातून दर आठवड्याला सादर करणार आहोत.या सदराचा आरंभ महाराष्ट्रातील ख्यातनाम ग्रामीण कवी प्रकाश होळकर यांच्यापासून करत आहोत .
कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथे राहतात. त्याचे नाव रत्नागिरीच्या साहित्य सम्मेलनातून प्रथम महाराष्ट्रभर पोहोचले.नगरच्या साहित्य संमेलनात ‘ माझा झुला तुला घे’ ही कविता तरूणाईच्या काळजात घर करून बसली.पुढे ‘टिंग्या’ चित्रपटातून गीत होऊन जागतिक स्तरावर पोहोचली.ग्रामीण कवितेचा विचार करताना प्रकाश होळकर हे नाव प्रकर्षाने पुढे येते .१९९७ साली त्यांचा ‘कोरडे नक्षत्र ‘हा कवितासंग्रह कविवर्य ना .धो.महानोर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लासलगाव येथे प्रकाशित झाला.शेती आणि शेतकरी जीवन हे संपूर्णपणे निसर्गावर आवलांबून आहे. त्यांच्या आयुष्यात इतर नक्षत्रांपेक्षा पावसाच्या नक्षत्रांना विशेष स्थान आहे.ही सगळी नक्षत्र कोसळेलच हे कुणालाच सांगता येत नाही. हातांच्या बोटांवर दिवस मोजण्यात आणि पावसाची वाट पाहण्यात शेतक-यांची वाट लागायची वेळ येते. अन्यथा हे सगळीच नक्षत्र कोरडे गेले तर शेतकऱ्याची वाताहात लागल्याशिवाय राहत नाही. अशा अवर्षणग्रस्त परदेशातील शेतीमातीत राबणा-या तमाम कृषी संस्कृतीची होणारी हेळसांड त्यांच्या चिंतनाचा विषय होतो.त्यातूनच त्यांची कविता फुलत जाते. त्यांच्या सा-या कवितामध्ये अस्सल ग्रामीण वास्तवाचं दर्शन वाचकांना घडते.
प्रकाश होळकरांची कविता गोवा,गुलबर्गा,नागपूर ,कोल्हापूर ,औरंगाबाद,मुक्त विद्यापीठ नाशिकआदी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहे. तसेच अतिशय सन्मानाची बाब म्हणजे २००९ मध्ये अमेरिकेत संपन्न झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात होळकर यांना काव्य वाचनांसाठी निमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सलग १० वर्षे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केलेली होती. ‘ रानगंधाचे गारुड ’ हे निसर्गकवी ना.धो.महानोर यांच्या निवडक पत्रांचे संपादन त्यांनी केले. त्यांचा आगामी काव्यसंग्रह ‘ मृगाच्या कविता ’ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,घन:श्यामदास सराफ ,विशाखा,कवी यशवंत,पद्मश्री विखे पाटील,कविवर्य वसंत सावंत,अनन्वय,कविवर्य ना.धो.महानोर काव्यपुरस्कारासह अन्य इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
प्रकाश होळकर यांच्या कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांची जाणीव अत्यंत वास्तव स्वरूपामध्ये व्यक्त होताना दिसते. त्यांच्या कवितेत व्यक्तिगत दुःखापेक्षा अत्यंतिक वेदनेची सामुदायिक वेदना जास्त प्रभावी ठरते. त्यांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडली गेली आहे.तिथल्या माणसांशी जोडली गेली आहे. हे अवतीभोवतीचं सकल समांतर वास्तव त्यांच्या सोबत त्यांच्या कवितेत उतरत जातं. शेती जीवनाचे अनेक संदर्भ कवी कवितेतून व्यक्त करताना दिसतो. त्यांच्या कवितेत रंग रूप रस गंध आणि स्पर्श त्याच्या विविध निसर्ग प्रतिमा सहजपणे येऊन जातात.कवी प्रकाश होळकर यांच्या कवितेचा लेखा-जोखा कोरडे नक्षत्र मध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडतात. शेतक-यांच्या आयुष्याची नाळ शेतक-यांचा आसूड उगारणा-या ज्योतिबाशी जोडली जाते. म्हणूनच ते कवितेतून थेट ज्योतीबांशी संवाद साधतांना लिहितात.
‘ ज्योतिबा,
खूप लिहून झालं
आणि खूप बोलूनही झालं यंदा,
पण माझ्या आतड्याचा पीळ
कोणी मोकळा केला नाही .
राहणारा राबत गेला
कमरेला माती लागेपर्यंत
आणि दाबला गेला मातीत
उभा आडवा डोळ्यादेखत
त्याची कुणाला खंत नाही !.’
अशी व्यथा ते मांडतात तर सर्वत्र दुष्काळ दुष्काळाने माणसं मरत आहेत .जनावरे मरत आहेत. अशा दुष्काळाचे वर्णन करताना होळकर लिहितात –
‘जीवन झालं बोराटीचं
बांधावरच्या बाभळीचं
दुष्काळाचा दिसे नाग
पाण्यासाठी भिक माग.
आयुष्याची सरी राख
उफणताना डोळे झाक.’
किंवा ‘ आभाळ’ या कवितेत होळकर ग्रामीण भागातील अल्लड पोरसवदा वयातील मुलीचे अवेळी झालेले लग्न, संसार यावर तिच्या स्वगतातून भाष्य करतात.ग्रामीण जीवनातील शेती मातीतील प्रचलित प्रतिमांचा किती चपखलपणे वापर करतात.
‘कसे भरले आभाळ
आणि कुठे झाला गडगडाट
अजून मला बरेच काही
झाकून ठेवायचे होते .
कुठून आला वारा
आणि कशा झेलल्या गारा
अजून माझ्या ओठांवरचे
उन्हं निवायचे होते.
कुठून आले पाणी
अन कसे तुंबले वाफे
अजून माझ्या मशागतीचे
दिवस यायचे होते.
किंवा
‘नक्षत्र संपून जातात कोरडयाहून कोरडे
जुन्या पागोटयांचं बोटं मोजणं थांबत नाही
पंचांगातल्या तारखा बदलतात
दिवस काही बदलत नाहीत .’
अतिशय हृदयस्पर्शी करुणामय जाणीव आपल्या शब्दांतून कवी करतो.
‘आता दिवसेंदिवस
जगणं किती कठीण होत चाललय…
देहाला भिरुड लागलं तरी
नव्यानं उगवून येता येत नाही ,
आणि दुःख माती आड करून
नव्यानं जगता येत नाही’.
किंवा दीर्घकाळाच्या प्रतीक्षेतून पावसाची आराधना करताना कवी म्हणतो-
‘भरु दे यंदा मृगाचं आभाळ
नावाचा तुझा येळकोट करील
वाहू दे यंदा वहळनाले
नावाचा तुझा येळकोट करील
पिकू दे यंदा खंडीभर रास
नावाचा तुझा येळकोट करील
भरू दे गाई गुरांनी गोठे
नावाचा तुझा येळकोट करील’.
अशी सामूहिक कल्याणासाठी कवी ईश्वराची आराधना करतो. वर्षामागून वर्षे पाऊस न पडल्याने सर्वत्र दुष्काळ पसरतो आहे. जनसामान्यांच्या जीवनाची वाताहात लागते. शेतकरी तर मेटाकुटीस येतो. त्याच्या आधारावर घरातली माणसं तर आहेत पण गाई बैलांसारखी जीत्रबं असतात. त्याचा गोतावळा फार मोठा असतो. अनेक कृमी कीटक त्याच्या आधारानं जगतात.
आयुष्याचा सर्वच स्थरातून जल्लोष अनुभवायला लावणारी कवी प्रकाश होळकर यांची कविता आहे . त्यांची कविता वाचकांना त्यांच्या अनुभवात नखशिखान्त भिजून टाकते. कवितेत मानवी भावभावनांची स्पंदने अत्यन्त समर्थपणे टिपण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची कविता वाचकाला, श्रोत्याला आणि रसिकाला वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.तर कधीकधी वाचकांच्या डोळ्यात अंजन घालते .
प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सारख्या ग्रामीण भागात राहणारे कवी आहेत. हा कवी शेती मातीत काबाडकष्ट करतो .स्वतःच्या अनुभव विश्वाची ,सुखदुःखाची, व्यथा वेदनेची कविता लिहितो. त्यांची कविता इतरांच्या आयुष्याला खूप काही उभारी देऊन जाते. त्यामुळे त्यांच्या अनेक कविता चित्रपटांमध्ये गीतं बनल्या आहेत. त्यांच्या अनेक गीतांना अनेक मान सन्मासन आणि पुरस्कार मिळाले आहेत. सर्जा-राजा ,कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा,प्रियतमा, पिंकी –एक सत्यकथा आदी चित्रपटात त्यांची गाणी आहेत. सर्जा-राजा,टिंग्या,टपाल, गोष्ट डोंगरा एवढी, बाबू बेंडबाजा या चित्रपटांच्या गीत लेखनाचे चारवेळा ‘ ग.दि.माडगुळकर राज्यपुरस्कार . चित्रम हर्षी बाबुराव पेंटर सन्मान चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या टिंग्या या चित्रपटात कवितेचं गाणं झालेली ही कविता.
माझे आभाळ
माझे आभाळ…तुला घे
तुझे आभाळ मला
आठवाच्या पारंबीला
बांधू एक झुला……
किंवा
‘कळत-नकळत धुई पसरून गेली आयुष्यात
आता झटकता झटकता हातही अपुरे पडतात
हे सारे झटकून आयुष्य उजळेल तरी आशा उरली नाही
मुळे उघड्या पडल्या तरी माती लोटण होत नाही ‘
ही कवीची मानसिक स्थिती एकूणच शेतकऱ्यांच्या जिवनाचं चित्र रेखाटून जाते. शेतकऱ्याचे मातीवरील पिकावर प्रेम किती असलं तरी ,त्याचं आयुष्य उजळेल असा भरवसा ठेवता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांची होणारी वाताहात ,त्यांच्या होरपळलेल्या जीवनाचे चित्रण आपल्या कवितांमधून सातत्याने करतात. प्रकाश होळकर यांची कविता म्हणजे नुसता कल्पनेचा खेळ नसून त्यांच्या आतड्याला पडलेला पीळ आहे .त्या पिळातून निघालेली वेदनेची कळ म्हणजे त्यांची कविता होय.प्रकाश होळकर यांची कविता त्यांच्याबरोबर अधिकाधिक समृध्द होते आहे.
कवी प्रकाश होळकर हे वेदनेला अस्सल प्रतिमांचे आणि प्रतिकांचे शब्दरूप देवून आपल्या प्रतिभेने रसिकांच्या काळजात स्थान मिळवून देणारे, आणि कवितेला अधिक उंची मिळवून देणारे कवी आहेत.. त्यांची ओळख सगळ्या महाराष्ट्राला आहेच. पण नाशिक जिल्ह्याच्या साहित्यिक इतिहासात त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल..
सलाम…
अतिशय सुंदर!
प्रकाशदादांच्या कविता रसिकाला भुरळ घालतात. झुला वाचताना, ऐकताना तो झुलामय होऊन जातो तर कोरड्या नक्षत्रांमध्ये स्वतःला होरपळून घेतो. खरोखर सामुदायिक वेदनांची कैफियत मांडणाऱ्या या कविता. जुन्या पिढीच्या तोंडी खेळलेली गाणी प्रकाशदांच्या बालपणावर संस्कार करून गेली आहेत, म्हणून त्यांच्या कवितांमधील शब्द सोपे, सुटसुटीत आणि थेट काळजाला भिडणारे असे असतात. जत्यांवरच्या ओव्या आणि त्यांच्या अवीट चालींनी या कवितांना समृद्ध केले आहे. मृगाच्या कविता नक्की मैलाचा दगड ठरतील.
सुंदर विश्लेषण सर.????