मुकुंद बाविस्कर, नाशिक
एखाद्याला आपण उजव्या हाताने मदत केली तर डाव्या हाताला देखील कळू नये असे म्हटले जाते. सध्या कोरोनामुळे अनेकांची धूळधाण झाली आहे. कुणाचा रोजगार गेला तर कुणाचा पगार बंद झाला. परंतु हजारो मदतीचे हात देखील धावून आले. वेतन नसलेल्या गुरुजींच्या मदतीसाठी त्यांच्या व्यवसायातील बंधू धाऊन आले आहेत. ही सोशल चळवळ त्यामुळेच सध्या चर्चेची बनली आहे.
आपल्या जीवनात सुसंस्काराचे बीज रोवणारे किंबहुना जीवन घडविण्यात गुरुजनांचा खूप मोलाचा वाटा असतो. मग तो शिक्षक प्राथमिक शाळेतील असो की महाविद्यालयातील असो. थोर समाजसेवक साने गुरुजी त्यांनी देखील गुरुजनांची महती वर्णन केली आहे. शिक्षक असो की प्राध्यापक त्यांचा शिक्षण क्षेत्रात त्याग मोलाचा असतो. परंतु केवळ त्यागावर पोट भरत नाही. घर- संसार चालवण्यासाठी पैसा लागतो. मात्र कोरोनामुळे पाच ते सहा महिन्यापासून शाळा -महाविद्यालय बंद असल्याने अनेक शिक्षक व प्राध्यापकांचे पगार बंद आहेत. विशेषतः विनाअनुदानित शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. काहींच्या तर घरातील किराणा देखील संपला होता. तर अनेकांचे घरभाडे थकले होते. अशावेळी त्यांच्या व्यवसायातील शिक्षकच मदतीला धावून आले.
एचपीटी महाविद्यालयामधील प्रा. डॉ. रामदास भोंग, प्रा. अजय अहीर, प्रा. यशवंत साळुंखे, प्रा. रमेश शेजवळ, प्रा. रमेश गिरी आदींसह अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येत ‘मी शिक्षक -मी मदत करणार’ असा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्याला जिल्हाभरातील पगारी शिक्षक आणि प्राध्यापकांनी प्रतिसाद देत मदत दिली. परंतु सदर मदत गोळा करताना मदत घेणाऱ्याचे नाव मुद्दामच सांगण्याचे किंवा जाहीर करण्याचे टाळले. जेणेकरून मदत घेणाऱ्या शिक्षकांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये.
आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापक, कामगार मजूर आदींसह विविध क्षेत्रातील सुमारे साडेचार हजार लोकांना या ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्यात आली. साधारणतः प्रत्येकी हजार रुपये पासून ते चार हजार रुपयांपर्यंत ही मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी, कामगार, परप्रांतीय मजूर, छोटे व्यावसायिक, वाड्या पाड्या वरील आदिवासी बांधव यांना देखील औषधी, मास्क, किराणा, कपडे आदींचे वाटप या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.