नाशिक – शहर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा तडीपारीचे शस्त्र हाती घेतले आहे. जुने नाशिक परिसरातील चौघा सराईतांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश परिमंडळ १ चे उपायुक्त अमोल तांबे यांनी पारित केले असून या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
शुभम उर्फ शंभू गोरख जाधव (२२),सुशांत कैलास वाबळे (३१),शिवम गोरख जाधव (२१) व भुषण जगदिश शिंदे (१९ रा.सर्व म्हसरूळ टेक,भद्रकाली) अशी तडिपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध पोलीस ठाणे हद्दीत संशयीत शरिराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस प्रतिबंध करण्यासाठी तडीपार प्रकरणाची चौकशी करून त्यांच्या विरूध्द शहर आणि जिह्यातून तडीपार केल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांविरूध्द तसेच दोषसिध्द गुन्हेगार आणि गँग तयार करणाºया सराईतांविरूध्द तडिपारीची कारवाई केली जात आहे.