नाशिक : फोरच्युनर वाहनात धारदार शस्त्र बाळगणा-या तिघा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीसांनी जेरबंद केले. संशयीतांच्या ताब्यातून वाहनासह चॉपर आणि कोयता जप्त करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
राहूल संदिप सोनवणे (रा.फर्नांडीस वाडी,जय भवानी रोड),शोएब मसुद खान (रा.हॅपी होम कॉलनी,आनंदनगर द्वारका) व समर मतीन पठाण (रा.अमरधामरोड कथडा) अशी प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून गुरूवारी (दि.११) ही कारवाई करण्यात आली. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस समोर एका इसमाच्या कमरेस धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर,उनिरीक्षक निवृत्ती सरोदे,हवालदार येवाजी महाले, पोलीस नाईक शरद सोनवणे,रावजी मगर,महेश साळुंके,शिपाई राहूल पालखेडे,समाधान जाधव आदींच्या पथकाने धाव घेत शोध घेतला असता पोलीसांची चाहूल लागताच संशयीतांनी एमएच १५ सी एस ९२९२ या फोरच्युनर वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी वेळीच झडप घालून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी संदिप सोनवणे या सराईताच्या कमरेस धारदार चाकू असल्याचे आढळून आले तर वाहनतपासणीत कोयता मिळून आला. संशयीतांच्या ताब्यातून फोरच्युनरसह चॉपर व कोयता हस्तगत करण्यात आला असून तीन ही संशयीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
…….
े