नवी दिल्ली – कोरोनाची लस आल्याने आता या संसर्गजन्य रोगाच्या भितीने ग्रस्त जगभरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. परंतु लस सर्वांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नाही. कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटनेने (इंटरपोल) इशारा दिला आहे की, कोरोना लसीची गुन्हेगारी संघटनांकडून तस्करी केली जाऊ शकते तसेच त्या लसीच्या पुरवठ्यात ते अडथळा आणू शकतात.
इंटरपोल एजन्सीने एक नोटिस जारी केली असून त्यात म्हटले आहे की, जगभरातील संघटित गुन्हेगारी गट नवीन कोविड -१९ या बनावट लस बनविण्याचा किंवा नवीन तयार झालेली लस चोरी करण्याचा प्रयत्न करु शकतात. कोरोना लस गुन्हेगारी संघटनांसाठी ती गोष्ट ‘लिक्विड गोल्ड’ सारखी आहे. १९४ सदस्य देशांच्या इंटरपोल एजन्सीने याबाबत लोकांना सतर्क केले. येत्या काही महिन्यांत नवीन लसीचा आंतरराष्ट्रीय प्रवास हळूहळू सुरू होणार आहे, या दरम्यान गुन्हेगारी संघटनेला बनावट लसी किंवा कोरोना व्हायरस चाचणीचा इशारा दिला जाऊ शकतो.
दरम्यान, इंटरपोलचे सरचिटणीस जर्गेन स्टॉक यांचे म्हणणे आहे की, या लसीच्या घोषणा झाल्या आहेत. सरकार त्यांच्या वतीने लोकांना लस देण्याची तयारी करीत आहे. त्याच वेळी गुन्हेगारी संस्था पुरवठा साखळ्यांमध्ये घुसखोरी किंवा अडथळा आणण्याचा विचार करीत आहेत. लसीशी संबंधित काही गुन्हेगारी कृती असण्याची शक्यता आहे .
लसीसाठी आपत्कालीन वापराचा अधिकार देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे, त्यानंतरच बायनटेक-फायझर यांनी विकसित केलेली कोरोना लस पुढच्या आठवड्यात येऊ शकेल.