वाराणसी – काही वेळा लहान मुले खोटे बोलून दिशाभूल करतात, मात्र त्याचा त्रास कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनाच सहन करावा लागतो. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली. संभळ जिल्ह्यातील चंदौसी येथे परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिसऱ्या वर्गातील आठ वर्षे वयाच्या एका विद्यार्थ्याने घर सोडले. मात्र या मुलाने त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. ही वार्ता मिळताच खळबळ उडाली. याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली असता अपहरणाची घटना खोटी ठरली. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
चंदौसी येथील रहिवासी असलेला आठ वर्षांचा मुलगा शहरातील एका शाळेत तिसऱ्या इयत्तेमध्ये शिकतो. एके दिवशी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुलगा चांदौसी येथील भैराती गेटजवळ लोकांकडे पैशाची मागणी करीत होता, त्याच्या पाठीला शाळेची बॅग (पिशवी ) लटकवलेली होती.
त्याचवेळी एका स्थानिक रहिवाशाने मुलाकडे शाळेची पिशवी असताना त्याला थांबवले आणि पैसे विचारण्याचे कारण विचारले. त्यावेळी मुलाने सांगितले की, तो सकाळी आठच्या सुमारास बिलारी येथे शाळेत चालला होता. तेव्हा एक व्हॅन कोचिंग सेंटरजवळ थांबली आणि त्यातील लोकांनी त्याचे अपहरण केले. व्हॅनमध्ये बसलेल्या व्यक्तीने त्याला बेशुद्ध केले. यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तो भैराती फाटकाजवळ रेल्वेच्या रेलिंगवर पडला होता.
एका व्यक्तीने त्याच्या तोंडावर पाणी ओतले, त्यानंतर त्याला जाणीव झाली. बिलारीला घरी परत जावे लागले, म्हणून पैसे मागत होते. स्थानिक व्यक्तीने मुलाला तिथेच थांबवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपहरणाच्या बातमीने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. मात्र ही घटना बनावट असल्याचे उघड झाले असून परिक्षेत मार्क कमी पडल्याने तो घरातून रागाने निघून जात होता. पोलिसांच्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाली आहे.