नाशिक – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अखेर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (८ सप्टेंबर) ठिय्या आंदोलन करीत अॅड. सदावर्ते यांच्यावर कारवाईची मागणी केली. शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर धाव घेतल्याने तणावाचे वातावरण प्राप्त झाले होते. पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चेतन शेलार (रा.अश्विननगर, पाथर्डीफाटा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून क्रांती मोर्चाच्या वतीने जनआंदोलन सुरू आहे. त्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज करीत आहेत मात्र, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. चिथावणीखोर सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे केली आहे. यासाठीच मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांन सरकारवाडा पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, निलेश शेलार, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे येथे तणावाचे वातावरण तयार झाले. त्याची दखल घेत पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी, विजय ढमाळ आदींनी धाव घेत समन्वयकांशी चर्चा केली. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर सदावर्ते यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.