नाशिक – कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही सीएट कंपनीने त्यांच्या कामगारांना बोनस जाहीर केला आहे. या कंपनीने कामगारांच्या करारातच बोनसच्या रकमेचाही समावेश केला होता. त्यामुळे हे बोनस जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत वाहन उद्योगाच्या मंदीमुळे कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. त्यात जिल्ह्यातील ३०० कंपन्यांना याचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत बोनस जाहीर झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वाहन उद्योगांसाठी लागणारे टायरचे उत्पादन सिएट कंपनीत घेतले जाते. सीएट कंपनीचे भांडुप व नाशिक याठिकाणी दोन प्लांट असून दोन्ही ठिकाणी सीआयटीयू (सिटू) प्रणित मुंबई श्रमिक संघाची युनियन असून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी बोनस देण्याचे ठरले आहे. दिवाळी तोंडावर आल्यामुळे कामगारांचे बोनसकडे लक्ष लागले आहे. बोनसनंतरच बाजारपेठेतसुध्दा चैतन्य निर्माण होते. कामगार कायद्यातही बोनस देण्याचा समावेश आहे. त्यामुळे कामगार संघटना याबाबत आग्रही आहेत. सातपूर व अंबड येथील ४० हून अधिक कंपन्यांबरोबर कामगार संघटना बोनसबाबत बोलणी करीत आहेत. यात पगाराच्या ८.३३ टक्क्यांच्यावर बोनस सर्वांना मिळण्याची आशा आहे. काही कंपन्यांत १० ते ३० टक्क्यांपर्यंत बोनस दिला जाणार असल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. सीएट ही टायर कंपनी असून, त्यांनाही वाहन उद्योगाच्या मंदीचा फटका बसला. पण, कंपनीने हा बोनस जाहीर करीत कागारांना दिलासा दिला आहे. २०२० मध्ये उद्योगांमध्ये असलेली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता सिएट कामगारांना मिळणारा बोनस ही मोठी उपलब्धी आहे. कंपनीने लॉक डाऊन काळातील पूर्ण पगार ही कामगारांना देऊ केलेला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीत कामगारांमध्ये एक समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. युनियनच्या वतीने अध्यक्ष भिवाजी भावले, सरचिटणीस- कैलास धात्रक, उपाध्यक्ष विनय यादव व पोपट सावंत, सेक्रेटरी आद्या शंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख व वाल्मीक भडांगे यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने एच.आर. हेड रोहित साठे,विश्वास चव्हाण व मेखे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
२०७४ कामगारांना लाभ
सीएट कंपनीत २०७४ कामगार आहेत. हा बोनस प्रत्येकाला त्याच्या पगारानुसार दिला जाणार आहे. त्यानुसार ४७ हजार ते ५५ हजारापर्यंत हा बोनस दिला जाणार आहे.