नाशिक – महाराष्ट्र गॅस लिमिटेड (एमएनजीएल) नाशिककरांना खुषखबर दिली असून या वर्षाच्या अखेरीस नाशिककरांना घरगुती वापरासाठी पाईप गॅस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कंपनीच्यावतीने शहरात युद्धपातळीवर काम सुरू आहे.
एमएनजीएल ही राज्य सरकारची कंपनी आहे. शहरात घराघरांमध्ये पाईप गॅस (पीएनजी) तर वाहनांसाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) देण्यासाठी कंपनीच्यावतीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सद्यस्थितीत कंपनी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. त्यामुळेच १५ हजाराहून अधिक फ्लॅट धारकांनी कंपनीकडे इच्छा प्रदर्शित केली आहे.
गेल आणि बीपीसीएल या कंपन्यांसोबत कंपनीने काम सुरू केले आहे. त्याद्वारेच नाशिकमध्ये पीएनजीसाठी भूमीगत पाईप लाईन टाकली जात आहे. दोन हजार घरांना पीएनजी पुरविण्यासाठी कंपनीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. या वर्षाअखेरीस कंपनीकडून गॅस पुरवठा केला जाणार आहे.
या भागाला प्राधान्य
कंपनीने सध्या गंगापूररोड, इंदिरानगर, राजीवनगर, प्रशांत नगर आदी भागावर लक्ष्य केंद्रित केले आहे. तेथे पीएनजीसाठी भूमीगत पाईप लाईन टाकणे, सोसायट्यांची मान्यता घेणे आदी कामे सुरू केले आहेत.
असा होणार फायदा
सद्यस्थितीत घरगुती गॅस ग्राहकांना सिलेंडर खरेदी करावे लागते. ते संपण्यापूर्वी ते नोंदवावे लागते. डिलेव्हरी बॉय सिलेंडर देतो. त्यातही रात्रीच्यावेळी गॅसची उपलब्धता नसते. मात्र, पीएनजीमुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गॅसची किंमत सध्याच्या गॅसपेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी कमी असणार आहे. तसेच, पाईपद्वारे हा गॅस २४ तास उपलब्ध असेल. यास एक मीटर असेल ज्याद्वारे किती वापर झाला त्यानुसार पैसे आकारले जातील. यात सिलेंडरची वाहतूक व हाताळणीही हद्दपार होणार आहे. तसेच, सुरक्षित गॅस घराघरात उपलब्ध होणार आहे.
Good one