नवी दिल्ली – भारतात सध्या कोविड -१९च्या दोन लसी उपलब्ध असून आणखी एक कोव्होवॅक्स नावाच्या लसीची क्लिनिकल चाचणी भारतात सुरू झाली आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी व्यक्त केली.
या संदर्भात पूनावाला यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोव्हॅवॅक्स बरोबर सीरमने परवाना करार जाहीर केला असून या लसीच्या विकास आणि व्यावसायीकरणासाठी या करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत आणि निम्न व मध्यम उत्पन्न गटातील देशांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच कोव्होवॅक्सची चाचणी भारतात सुरू झाली आहे. नोव्हॅवॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्या भागीदारीत ही लस विकसित केली जात आहे.
आफ्रिका आणि ब्रिटनमधील कोविड -१९ च्या नवीन विषाणूच्या प्रकारांविरुद्ध या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. त्याची एकूण कार्यक्षमता 89 टक्के असल्याचे दिसून आले आहे. ही लस सप्टेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध होईल. तथापि, नोव्हॅवॅक्स आणि सिरम दरम्यानच्या व्यावसायिक करारामध्ये उच्च-मध्यम आणि उच्च-उत्पन्न देशांना लस देण्याचा समावेश नाही.
या वर्षाच्या कोव्होवॅक्स जून २०२१ पर्यंत उत्पादन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सीरमने या आधीच कोविड -१९ वर कोविशिल्ट ऑफ अॅस्ट्रॅजेनेका ही लस आणली असून भारत ती लस जगातील अनेक देशांना पुरवित आहे.