मुंबई – राज्य सरकार पोलिसांची १२ हजाराहून अधिक पदे भरणार आहे. या प्रस्तावास राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येतील, असे बैठकीत सांगण्यात आले.