पुणे – शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यातील सुमारे १६ टक्के म्हणजे तब्बल २२९ गावांत आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष प्रसाद, यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आजपर्यंत या गावांमध्ये, कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १३ तालुक्यात मिळून ही गावं आहेत. विशेष म्हणजे या सर्व तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असला तरी ही ठराविक गावं मात्र या आजारापासून बचावली आहेत. या २२९ गावांत मिळून सुमारे ५ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. परजिल्ह्यातून किंवा परगावातून इथं नागरिकांची ये जा सुरु असते.
मात्र तरीही केवळ कोरोनाविषयक नियमावलीचं अतिशय योग्य पद्धतीनं पालन केल्यामुळेच ही गावं कोरोनामुक्त राहिल्याचा दावा, प्रसाद यांनी केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सुमारे १०० गावांत कोरोनाचा केवळ एखाद-दुसरा रुग्ण सापडल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.