नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याला नाशिकशी जोडणारा रस्ता आता काँक्रिटचा होणार आहे. त्यासाठी चक्क जागतिक बँकेने तब्बल १७० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रस्त्याचे हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती खुद्द भुजबळ यांनीच दिली आहे.
पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. येवला भूमिगत गटारींसह रस्त्याची रखडलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. येवला-विंचूर चौफुली येथे अनेक व्यावसायिक व्यवसाय करत होती याठिकाणी नवीन शॉपिंग सेंटरची निर्मिती करण्यात येत असून याठिकाणी १५० गाळे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या विस्थापित व्यावसायिकांच्या व्यवसायांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.