नवी दिल्ली – गेल्या २४ तासात ५१ हजार २२५ कोरोना रुग्ण देशात बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची देशातील आतापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ६२९ एवढी आहे. गेल्या २४ तासात एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून परिणामी रुग्ण बरे होण्याचा दर ६५.४४ या नवीन उच्चांकापर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की जास्तीत जास्त कोविड-१९ चे रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सोडले जात आहेत.
रुग्ण बरे होण्याची संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यामधील तफावतीत निरंतर वाढ दिसून आली आहे. १० जून रोजी पहिल्यांदा बरे झालेल्या रूग्णांची संख्या १ हजार ५७३ च्या फरकाने सक्रीय रूग्णांपेक्षा अधिक होती. जी आजपर्यंत वाढून सध्या ५ लाख ७७ हजार ८९९ वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ही भारतातील वास्तविक रुग्णसंख्या असून सध्या सक्रिय रुग्ण ५ लाख ६७ हजार ७३० आहेत. म्हणजेच एकूण रुग्णसंख्येच्या ३२.४३% इतके आहेत आणि हे सर्वजण रूग्णालयात किंवा घरगुती अलगीकरणामध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
प्रभावी प्रतिबंध धोरण, वाढ्त्या चाचण्या आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन मानकांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या परिणामामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्यपूर्ण वाढत आहे आणि मृत्युदर उत्तरोत्तर कमी होत आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात रुग्णांचा मृत्यूदर (सीएफआर) २.१३% म्हणजे सर्वाधिक कमी असणाऱ्यांमध्ये आहे.