मुंबई – सर्व विमा कंपन्यांनी कमी हफ्त्यातील टर्म प्लान आणला आहे आणि विशेष म्हणजे सर्व कंपन्यांचे नियमही सारखेच असणार आहेत. १ जानेवारीपासून ते लागू होणार आहेत. त्यामुळे जाणून घेऊया याविषयी…
महत्त्वाचे
सेव्हिंग असो वा ईएमआय, आपल्या खिशाला कात्री लागणार नाही, याची संपूर्ण काळजी मध्यमवर्गीय माणूस घेत असतो. कारण दैनंदिन जगण्याचा संघर्ष आज सेव्हींगपेक्षाही अधिक महत्त्वाचा झालेला आहे. याचाच विचार करून विमा कंपन्यांनी टर्म प्लॅन आणत आहेत. सर्व विमा कंपन्या १ जानेवारीपासून हा टर्म प्लान लॉन्च करीत आहेत. यात ग्राहकांना कमीत कमी प्रिमीयमवर टर्म प्लान खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
प्रिमिअम सारखेच
भारतीय विमा नियामक तसेच विकास प्राधिकरणाच्या निर्देशांवर विमा कंपन्यांनी सरल जीवन विमा धोरण आणले आहे. याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गियांना तसेच अत्यल्प उत्पन्न असलेल्या वर्गाला होणार आहे. यातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सम अशुअर्ड (कव्हर) आणि प्रिमीयम सारखेच असणार आहे. त्यामुळे क्लेमच्या वेळी वादाची शक्यताही कमी झाली आहे. प्लान निवडताना ग्राहकांनी विविध विमा कंपन्यांच्या या प्लानच्या किमती व क्लेम सेटलमेंटचा रेश्यो याची तुलना नक्कीच करायला हवी. त्यासाठी प्राधिकरणाच्या आदेशांवरूनच सर्व विमा कंपन्यांनी आरोग्य संजीवन हा विमा आणला होता, हे विशेष.
असा मिळेल लाभ
पॉलिसी बाजार डॉट कॉमचे मुख्य बिझनेस अधिकारी संतोष अग्रवाल यांनी सांगितले की सरल जीवन विमा एक जोखीम नसलेला टर्म प्लान असेल. यात पॉलिसीच्या कालावधीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना संपूर्ण रक्कम दिली जाईल. अर्थात विमा काढल्यानंतर ४५ दिवसांच्या आत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाला तरच संपूर्ण रक्कम मिळेल. इतर कुठल्या कारणाने मृत्यू झाल्यास त्याला मोबदला लागू नसेल.
२५ लाख रुपयांचे सम-अशुअर्ड
प्राधिकरणाच्या नियमांनुसार या पॉलिसीसाठी किमान वय १८ आणि कमाल वय ६५ असणे बंधनकारक असेल. तसेच पॉलिसीचा कालावझी ५ ते ४० वर्षांपर्यंतचा असेल. जास्तीत जास्त ७० वर्षांपर्यंतची मॅच्युरिटी घेता येणार आहे. तर यात ५ ते २५ लाख रुपयांपर्यंत सम-अशुअर्ड मिळू शकणार आहे.