नवी दिल्ली – देशातील कोरोनाची एक लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर इतर दोन लसींची प्रगतीही समाधानकारक असून त्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही या सर्व लस विकसित करणाऱ्या संस्थांकडून आढावा घेतला असून, त्यांची प्रगती समाधानकारक आहे, असं त्यांनी सांगितलं. लसीकरण विषयक बाबी आणि पुरवठा साखळीची संपूर्ण तयारी झाली आहे. जेंव्हा केंव्हा गरज लागेल तेंव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारावर लसीकरण विषयक तयारीचे सूक्ष्मपातळीवरील नियोजन लगेच अमलात आणले जाईल असेही पॉल म्हणाले.
लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरु असून त्यांना सरकारकडून काय सुविधा अपेक्षित आहेत याविषयी बोलणे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. या लसीची अंदाजे किंमत किती असेल ते सांगण्याची विनंतीही आम्ही उत्पादकांना केली आहे, असे डॉ पॉल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. मात्र यातल्या काही लसींच्या चाचण्या प्राथमिक स्तरावर असल्यामुळे आत्ताच त्याचं मूल्य ठरवणं कठीण आहे. साधारण किंमत किती असू शकेल याचा आम्हाला अंडज आहे, मात्र जसजशी प्रगती होईल तशीच याबद्दल निश्चित माहिती देता येईल. प्रत्येक उत्पादक कंपन्यांना त्यांच्या लस उत्पादन क्षमतेविषयीची आकडेवारी आणि क्षमता वाढविण्यासाठीचाही अंदाज देण्यास सांगितलं आहे, असंही डॉ पॉल म्हणाले.