नवी दिल्ली /मुंबई – कोरोनापासून बचाव करण्यासाठी व्हॅक्सीन घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना कोरोनाची लागण यापूर्वी होऊन गेली आहे, त्यांच्यात व्हॅक्सीनचा एकच डोस अँटीबॉडीचा स्तर वेगाने वाढवतो. देशातील वैज्ञानिकांनी व्हॅक्सीन घेणाऱ्यांच्या संदर्भात संशोधन केल्यानंतर ही बाब स्पष्ट केली आहे.
संशोधनानुसार कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये व्हॅक्सीनचा पहिला डोस ५०० पटींनी अँटीबॉडी वाढवतो. या लोकांमध्ये दुसऱ्या डोसचा प्रभाव फारसा बघायला मिळाला नाही. दिल्लीतील इन्स्टिट्यूट आफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) येथील वैज्ञानिकांनी आरोग्यसेवकांच्या बाबतीत हे संशोधन केले. त्यानंतर यासंदर्भातील दावा केला आहे.
या संशोधनासाठी दोन वेगवेगळ्या समूहांना व्हॅक्सीन देऊन अँटीबॉडीचा स्तर मोजण्यात आला. यात एक समूह असा होता ज्यात पहिले कोरोना झाला होता आणि नंतर त्यांना व्हॅक्सीन देण्यात आले. दोन्ही समूहांना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस देण्यात आले.
७, १४ आणि २८ दिवसांच्या अंतराने अँटीबॉडी तपासल्यानंतर संशोधकांना ही माहिती हाती लागली. अमेरिकेतील वैज्ञानिकांनीसुद्धा याच प्रकारचे एक संशोधन केले. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांना पूर्वी कोरोना झालेला आहे, त्यांना व्हॅक्सीनचा पहिला डोस दिल्यानंतरच मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या. या साऱ्यांमध्ये दुसऱ्या डोसचा प्रभाव बघायला मिळाला नाही.
कोव्हीशिल्ड लावताच वाढल्या अँटीबॉडी
भारतातील संशोधकांनी लस देण्यापूर्वी सर्वांच्या अँटीबॉडीचा स्तर तपासला होता. त्यांना कोव्हीशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर ५०० टक्क्यांपर्यंत अँटीबॉडी बुस्ट झाली. मात्र दुसरा डोस दिला तेव्हा त्याचा काहीच प्रभाव बघायला मिळाला नाही.