नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ झाला आहे. या या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना केवळ एसएमएसद्वारे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येणार आहे. यानंतर प्रॉपर्टी कार्डची हार्ड कॉपी देखील संबंधित राज्य सरकारांकडून वितरीत केल्या जातील. राष्ट्रीय पंचायती दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत ग्रामस्थांच्या जमिनी ड्रोनद्वारे सीमांकन केल्या जाणार आहेत. यानंतर डिजिटल नकाशा तयार होईल आणि त्यानुसार प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहेत.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायतराज मंत्रालय मुख्य असणार आहे. खेड्यातील प्रत्येक घराचे प्रॉपर्टी कार्ड बनविणे ही जबाबदारी राज्य सरकारची असेल. महसूल किंवा जमीन विभागाच्या मदतीने हे काम पूर्ण होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील घरांच्या मालकीची नोंद तयार केली जाणार आहे. राज्यांचे महसूल विभाग प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
मालकी योजनेचे लाभार्थी सहा राज्यांतील ७६३ खेड्यांमधील आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधील ३४६, हरियाणामध्ये २२१, महाराष्ट्रात १००, मध्य प्रदेशात ४४, उत्तराखंड येथे ५० आणि कर्नाटकातील दोन खेड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांतील लाभार्थ्यांना मालमत्ता कार्डाच्या प्रती एका दिवसात प्राप्त होणार आहेत. महाराष्ट्रात प्रॉपर्टी कार्डसाठी काही रक्कम गोळा करण्याची तरतूद आहे, त्यामुळे यास एक महिन्याचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले आहे.
अशी आहे अर्ज प्रक्रिया
अर्जदाराने प्रथम पंतप्रधान मालकी योजना https://egramswaraj.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर नवीन नोंदणीचा पर्याय निवडून संपूर्ण माहिती अचूक भरावयाची आहे. संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरल्यानंतर सबमिट बटण दाबावे. नोंदणीशी संबंधित कोणतीही माहिती मोबाईल नंबरवर एसएमएस किंवा ईमेलद्वारे प्राप्त होईल.