नवी दिल्ली – भारताला लवकरच नेव्हीगेशन अॅप मिळणार आहे. सोबतच मॅपिंग पोर्टल आणि भू स्थानिक डाटा सर्व्हिस उपलब्ध होणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं (इस्त्रो)
लोकेशन अँड नेव्हीगेशन टेक्नॉलॉजी सोल्यूशन प्रोव्हायडर MapMyIndia सोबत एक करार केला आहे. यामध्ये भारत स्वदेशी नेव्हीगेशन सेवा उपलब्ध करून देणार आहे.
MapMyIndiaचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक रोहन वर्मा यांनी सांगितलं की, इस्त्रोकडून सॅटेलाइट छायाचित्रे आणि ऑब्झर्व्हेशन डाटा उपलब्ध करून देण्यात येईल. तर MapMyIndia कडून डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
आत्मनिर्भर अभियानात हा प्रकल्प भारतासाठी महत्त्वापूर्ण ठरेल, असं त्यांनी सांगितलं. आता यूजर्सना नेव्हीगेशन सेवा, नकाशा आणि भूस्थानिक सेवांसाठी Google Map, Google Earth सारख्या परदेशी संस्थांवर अवलंबून राहावं लागणार नाही, असं रोहन वर्मा यांनी स्पष्ट केलं.
इस्त्रोचा MapMyIndia सोबत करार
इस्त्रोच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेसनं MapMyIndia सोबत करार केला आहे. यामध्ये NavIC, Bhuvan सारखी स्वदेशी सेवेची मदत घेतली जाणार आहे. इंडियन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टिमला (IRNSS) NavIC (Navigation With Indian Constellation) म्हटलं जातं. ही भारताची स्वदेशी नेव्हीगेशन सिस्टिम असून, इस्त्रोनं तिला विकसित केलं आहे. Bhuvan हे एक केंद्रीय जिओ- पोर्टल असून त्यालाही इस्त्रोनं विकसित केलं आहे. यामध्ये भू स्थानिक डाटा सर्व्हिस आणि अॅनालिसिससाठी टूल आहेत.
यामध्ये विशेष काय
स्वदेशी नेव्हीगेशन अॅप अनेक गोष्टींमुळे Google Map पेक्षाही विशेष असणार आहे. यामध्ये
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, सीमाभाग दर्शवला जाणार आहे. यामध्ये भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहील यावर विशेष भर दिला जाईल. यामध्ये इस्त्रोकडून उपलब्ध करून दिले जाणारे खरे सॅटेलाइट छायाचित्र मिळेल. स्वदेशी नेव्हीगेशन अॅप मोफत असेल.
स्वदेशी अॅप कोणत्याही वैज्ञानिक बिझनेस मॉडेलसोबत दर्शवले जाणार नाही. MapMyIndia च्या नकाशामध्ये भारतातली सर्व ७.५ लाख गावे, ७५०० शहरांचे रस्ते, इमारतींना दर्शवतं. तसंच देशातल्या सर्व ६३ लाख किलोमीटर रस्त्यांच जाळं दर्शवतं. हे अॅप जवळपास ३ कोटी स्थानांची माहिती उपलब्ध करून देणार आहे.