नवी दिल्ली – गुगलनं आपल्या प्रसिद्ध गॅलरी अॅप असलेल्या गुगल फोटोजमध्ये नवे अपडेट आणले आहेत. याद्वारे युजर्सना नवे फोटो एडिटिंग टूल्स मिळाले आहेत. यामध्ये पोर्ट्रेट लाईट (Portrait Light) आणि पोर्ट्रेट ब्लर (Portrait Blur) यासारख्या टूल्सचा समावेश आहे. या टूल्सद्वारे तुम्ही आपल्या फोटोंना सहजरित्या एडिट आणि ब्लर करू शकतात.
आतापर्यंत हे फिचर्स फक्त पिक्सेल फोन यूजर्सपर्यंत मर्यादित होते. ते आता इतर युजर्सनाही मिळाले आहेत. परंतु त्यासाठी तुमच्याकडे गुगल वन सब्सक्रिप्शन, अॅन्ड्रॉईड ८ किंवा त्यापेक्षाही वरील व्हर्जन तसंच कमीत कमी ३ जीबी रॅम असणं गरजेचं आहे.
Portrait Light टूलचा उपयोग कसा करावा
गुगल फोटोजच्या मदतीनं आता तुम्ही सहजपणे पोर्ट्रेट फोटोंची लायटिंग अॅडजेस्ट करू शकणार आहात. तुमची सावली (Shadows) कशी दिसेल आणि त्यांची दिशा काय असेल, हे तुम्ही नव्या एडिटिंग टूलमध्ये ठरवू शकता. या फिचरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला पोर्ट्रेट फोटो गुगल फोटोज अॅपमध्ये ओपन करावा लागेल. त्यानंतर एडिट बटनवर टॅप करावं लागेल. त्यानंतर Portrait Light टूलला अॅप्लाय करावं लागेल. फिंगर स्लाईड करून यामध्ये तुम्ही बदल करू शकतात.
Portrait Blur टूलचा उपयोग कसा करावा
या फिचरच्या माध्यमातून तुम्ही साधारण फोटोंमध्ये DSLR सारखं ब्लर करू शकतात. म्हणजेच जे फोटो तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये आणू शकले नाही, तेव्हा हे फिचर चांगलं काम करेल. गुगल फोटोजच्या माध्यमातून अशा फोटोंमध्ये डेफ्थ इफेक्ट किंवा ब्लर चा पर्याय निवडू शकता. त्यासाठी तुम्हाला गुगल फोटोजमध्ये फोटो ओपन करून एडिटमध्ये जावं लागेल. इथं ब्लर पर्यायाला निवडावे आणि फिंगर स्लाईड करून आपल्या आवडीचा ब्लर इफेक्ट निवडू शकता.
गुगल वन मेंबरशिप कशी मिळवाल
गुगल वन मेंबरशिप (Google One Membership) मध्ये वर उल्लेख केलेल्या फोटो एडिटिंग टूल्सचा समावेश आहे. सोबतच गुगल अकाउंट, जी मेल आणि गुगल डॉक्ससाठी स्टोरेज मिळू शकते. सध्या भारतात गुगल वन मेंबरशिप तीन प्रकारात उपलब्ध आहे. १०० जीबी स्टोरेजसाठी १३० रुपये महिना किंवा १३०० रुपये वर्षासाठी आहेत. २०० जीबी स्टोरेजसाठी प्लॅन २१० रुपये महिना किंवा २१०० रुपये वर्षभरासाठी उपलब्ध आहे. याचप्रकारे २ टीबीचा प्लॅन ६५० रुपये किंवा ६५०० रुपये एक वर्षासाठी उपलब्ध आहे.