मुंबई – गुगल पे ने ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षिततेसंबंधी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी म्हटले आहे की ग्राहकांचे त्यांच्या डेटावरील नियंत्रण अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोपनियतेचे काही फिचर्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नव्या फिचर्समधून ग्राहकांना व्यवहाराचा डेटा आपल्या नियंत्रणात ठेवण्याची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात नवे अपडेट्स जारी केले जातील, असेही गुगल पे ने स्पष्ट केले आहे.
नव्या अपडेट्सनंतर ग्राहकांना हे ठरविता येईल की त्यांच्या आर्थिक व्यवहारावर त्यांनी किती नियंत्रण ठेवायला हवे. अपडेट करताच हे विचारले जाईल की त्यांना नियंत्रण अॉन ठेवायचे आहे की अॉफ. गुगल पे चे उपाध्यक्ष (उत्पादन) अमरीष केंघे यांनी म्हटले आहे की गोपनियतेला आम्ही पहिलेपासूनच प्राधान्य दिले आहे.
सध्या आपण गुगल पे वरून कुठलाही व्यवहार केला तर तो गुगल पे वरच राहतो. मात्र आता गुगल पेवरसुद्धा आपल्या व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याची संधी दिली जाणार आहे. अर्थात मोबाईल रिचार्जचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की ग्राहकांना आता रिवॉर्ड आणि आफर देण्यासाठीही या डेटाचा वापर करायचा की नाही, हे ग्राहकांनाच ठरविता येणार आहे.