नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये अॅपल कंपनीला विलक्षण प्रसिद्धी मिळाली आहे. वाढती पसंती आणि उत्तम सेवा यामुळे अँपलने लोकप्रियेतचा कळस गाठला आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या आधारावर कंपनी स्वतःच्या सर्च इंजिनवर काम करत आहे.
फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे. गुगलवर होणाऱ्या आरोपांमुळे अॅपलने सर्च इंजिन तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. वास्तविक सर्च इंजिनच्या दुरुपयोगाबद्दल गुगलची चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत गुगलने करार रद्द केल्यास अॅपल अडचणीत येऊ शकते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे.
अहवालानुसार, अॅपलने सर्च इंजिन डेव्हलमपेंट मधील तज्ज्ञ मंडळींना संघटित केले आहे. विशेष म्हणजे यात गुगलचे माजी कर्मचारी देखील आहेत. यासंदर्भात कंपनी सध्या नवी भरती करते आहे. त्याचप्रमाणे हल्ली अँपलने मोबाईलमध्ये सर्च करण्यासाठी असलेल्या सुविधेत बदल केला आहे. त्यामुळे आता कोणतीही गोष्ट सर्च केल्यावर सुरवातीला अॅपलद्वारे माहिती प्राप्त होते. मात्र, ही सुविधा सध्या IOS १४ साठी सुरु आहे. या सगळ्या प्रयत्नातून अॅपल स्वतःचे सर्च इंजिन लवकरच तयार करणार असे स्पष्ट दिसते आहे.
जेव्हा अॅपलचे सर्च इंजिन येईल त्यावेळी त्याची स्पर्धा थेट गुगलशी असणार आहे. जगभरातील ९० टक्के लोकांनी गुगलच्या सर्च इंजिनचा वापर करतात. याआधी अनेक नवख्या कंपन्यांनी स्वतःचे सर्च इंजिन तयार केले आहे. त्यामुळे आता जगप्रसिद्ध अॅपलचे सर्च इंजिनला कशी पसंती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.