जीमेल वापरताना १५ जीबी साठवणूक क्षमता पुरत नाही. त्यामुळे बहुतांश लोक किमान १०० जीबी डेटा विकत घेतातच. परंतु काहीजणांना हे १०० जीबीही पुरत नाहीत. व्यावसायिक कारणासाठी त्यांना १० टीबी , २० टीबी, ३० टीबी अशी प्रचंड जागा लागते. या व्यावसायिक लोकांसाठी एक खुशखबर आहे. भारतात आता १० टीबी डेटासाठी दरमहा ६५०० रुपयांऐवजी ३२५० रुपये मोजावे लागतील. २० टीबीसाठी १३ हजार रुपयांऐवजी ६५०० रुपये द्यावे लागतील. तर ३० टीबीसाठी १९५०० ऐवजी ९७५० रुपये द्यावे लागतील. सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी मात्र १०० जीबीसाठी वर्षाला १३०० (महिन्याला १०९ रुपये ), २०० जीबीसाठी २१०० (महिन्याला १७५) रुपये कायम ठेवण्यात आले आहेत. आता गूगल एक जून २०२१ पासून गूगल फोटोजमधला डेटा ही मूळ १५ जीबीत समाविष्ट करणार असल्याने हे दरही कमी व्हावेत अशी तुमची माझी अपेक्षा असली गूगल एवढ्यात हे दर कमी करील असे वाटत नाही.
तुम्ही आयफोन वापरत असाल तर गुगलने आणखी एक खुशखबर दिली आहे. गूगल वन हे अँप ios प्रणालीवरही उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे आयफोनमधील कॉन्टॅक्टस, कॅलेंडर, फोटो आणि व्हिडिओ यांचा क्लाऊड बॅकअप घेणे सोपे झाले आहे. गूगलचे जे ग्राहक किमान १०० जीबी डेटा विकत घेतात त्यांनाच ही सुविधा मिळेल. या सोयीसाठी महिन्याला १०९ रुपये देण्यास तयार असल्यास फायदाच फायदा होईल.
(ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर यांच्या वेबसाईटवरुन साभार)