मालेगाव – गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतांनाच काही समाजकंटकामार्फत त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील मासळी मृत झाली असून मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासोबतच तेथे कर्तव्यास असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी दिले.
गिरणा धरणातील पाण्यामध्ये विषारी द्रव्याचा वापर केल्यामुळे प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, गिरणा धरणाचे उप विभागीय अभियंता हेमंत पाटील, पशुधन विकास अधिकारी श्री.कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.हितेश महाले यांच्याबरोबरच पोलीस प्रशासनासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले, धरणातील मृत मासळीच्या सेवनामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका होवू शकतो. यामुळे धरणातील मृत मासळी खुल्या बाजारात विक्री होता कामा नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारास ताब्यात घेवून मृत मासळी तात्काळ नष्ट करण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर धरणातून ज्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात त्या पाणी तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नागरिकांच्या जिवीताशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करणार
गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विविध भागात पाणी पुरवठा योजना राबविल्या जातात. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय देखील सुरू असतो. पारंपारीक पध्दतीने मासेमारी न करता मासेमारी सुकर होण्यासाठी काही समाजकंटक विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु यामुळे नागरिकांच्या जिवीताशी होणारा खेळ खपवून घेणार नाही. आजच्या प्रकाराची संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषीवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या जिवीताशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचेही मंत्री भुसे यावेळी म्हणाले.
तळवाडे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचे आदेश
गिरणाधरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने रात्री पासून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तळवाडे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश मंत्री श्री.भुसे यांनी दिले. तसेच पोलीस प्रशासनास या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देवून दोषींवर कडक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
उपमहापौरांसह महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पहाणी
गिरणाधरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने रात्री पासून मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणारे पंपींग स्टेशन खबरदारीचा उपाय म्हणून खंडीत करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार यांनी दिले आहेत. सकाळी महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, प्रभाग क्रं.1 चे सभापती राजाराम जाधव, आयुक्त दिपक कासार, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, सहायक आयुक्त वैभव लोंढे, विद्युत अधिक्षक अभिजित पवार, पाणीपुरवठा उपअभियंता जयपाल त्रिभुवन, जलशुध्दीकरण केंद्र पर्यवेक्षक संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांसमवेत गिरणाधरण परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली.