नाशिक – जिल्हा परिषद गांडोळे येथे सुरू करण्यात आलेल्या दोन विद्यार्थी वाचनालयाला सोशल नेटवर्किंग फोरम या समाजसेवी संस्थेच्या माध्यमाने कृतीयुक्त पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष माननीय प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे, दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद गांडोळे येथील विद्यार्थी वाचनालयाला सुमारे १०० कृतीयुक्त पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, भेट देण्यात आलेल्या पुस्तकात ७० टक्के पुस्तके ही विद्यार्थ्यांना कृती करायला लावणारी आहेत. त्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर अधिक परिणाम होणार आहे. या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपयोग घेता येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
पुस्तक प्रदान समारंभ छोटेखानी झाला. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये, मोहन जाधव, पोलीस पाटील हर्षदा भोये यांनी त्यांच्या राहत्या घराची जागा वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. या जागेतच हा छोटेखानी कार्यक्रम मुख्याध्यापक भगवंत भोये यांच्या मार्गदर्शनात कोरोना काळातील सोशल डिस्टंसिंग तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन करून घेण्यात आला.
सूत्रसंचालन प्रल्हाद पवार यांनी केले. भगवंत भोये, धनराज भोये, प्रल्हाद पवार, सचिन भामरे आदींनी आभार मानून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लीला भोये, मधुकर सहाळे यांनी प्रयत्न केले.