नाशिक : मालकीणच्या लाखों रूपयांच्या डायमंड टॉप्सवर मोलकरणीने डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. जेलरोड भागात घडलेल्या या घटनेत वयोवृध्द मालकीणचा गळा आवळून मोलकरीणने टॉप्स पळविले असून, पोलीसांनी संशयित महिलेस बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल हिरामण विखे (४० रा.विघ्नेश्वर अपा.जेलरोड) असे संशयीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उमा बंकुबिहारी मलीक (८४ रा.नेताजी सुभाष कॉलनी,रामदास स्वामी नगर टाकळीरोड) या वृध्देने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलीक या आपल्या बंगल्यात एकट्याच राहतात. संशयित महिलेस बाहेरगावी राहणा-या मलिक कुटुंबियांनी गेल्या महिन्यात कामावर ठेवले असून तिच्यावर घरकामासह वृध्द उमा मलीक यांच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोलकरीण असलेल्या संशयीत महिलेने मलीक यांच्या कानातील टॉप्सची माहिती घेवून ही जबरी चोरी केली. मलीक आणि मोलकरीणच्या चर्चेत टॉप्स तीन लाख रूपयांचे असल्याची माहिती मिळाल्याने संशयीत महिलेने गेल्या बुधवारी (दि.१३) घरात कुणी नसल्याची संधी साधत वृध्देशी झटापट केली. या घटनेत तीने वृध्देस पलंगावर ढकलून देत तिचा गळा दाबून सुमारे तीन लाख रूपये किमतीचे कानातील टॉप्स बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेत वृध्दा जखमी झाल्या असून त्यांनी आपबिती कुटुंबियांकडे कथन केल्याने संशयित महिला पोलीसांच्या हाती लागली असून तिला न्यायालयाने शुक्रवार (दि.२२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.