नवी दिल्ली/रायपूर – छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात पोलिसांच्या गळाला एक मोठा मासा लागला आहे. तपासात पोलिसांसमोर अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यामुळेच हा चोर सध्या विशेष चर्चेत आहे.
वारंवार पोलिसांना चकवले
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत भिलाई, दुर्ग, रायपुर, इत्यादी शहरांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी झालेल्या लूटमार आणि घरफोडीचा आरोपी अभिषेक जोशी याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांची अख्खी टीम या आरोपीचा शोध गेल्या दोन महिन्यांपासून घेत होती, मात्र चतुर असा हा चोर पोलिसांना दरवेळी चकमा देण्यात यशस्वी होत असे. चौकशीदरम्यान आरोपीने १७ ठिकाणी लुटमार केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून एक डझनहून अधिक मोबाईल फोन्स जप्त केले आहेत.
प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने विकले घर
अभिषेकच्या प्रेयसीने त्याच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने निराश होवून त्याने आपला अडीच कोटी किमतीचा बंगला फक्त १४ लाख रुपयांना विकून टाकला आणि त्यानंतर चोरी आणि लुटमार हे काम सुरु केले. आपली खुन्नस काढण्यासाठी अभिषेकने बहुतेक वेळी महिला आणि मुलींनाच आपले लक्ष्य बनवले. त्याने जवळपास ५० ठिकाणी चोरी, वाटमारी आणि लुटमार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भिलाई मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला चाकू मारण्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
असे पकडले त्याला
सीसीटीवी फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीस अटक केल्याचे समजते. त्याच्याजवळ फोन असायचा मात्र बहुतेक वेळी फोन बंद ठेवलेला असल्याने त्याचे लोकेशन प्राप्त करणे कठीण होत असे. शेवटी रायपुर च्या एका हॉटेल मध्ये त्याचे लोकेशन प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः हॉटेलच्या स्टाफचा वेश करून त्याच्या खोलीत पोचले आणि त्याला पकडले. आरोपीने चौकशी दरम्यान सांगितले की, आपल्या आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा आहे. वडील बँकेत नोकरी करायचे. आरोपीने बीसीए पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. त्याxना सांगितले की कॉलेजमध्ये त्याचे आणि एका मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांना लग्नही करायचे होते. याच दरम्यान आरोपीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. प्रेयसीने सुद्धा त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. यानंतर निराश होऊन आरोपीने अपराध जगतात पाउल ठेवले.