मुंबई – चित्रपट अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद हा लोकांची मदत करण्यासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई मधील जुहू भागात असलेली आपली दोन दुकाने आणि सहा सदनिका गहाण ठेवून लोकांची मदत करण्यासाठी १० कोटी रुपये उभे करण्याचा सोनूचा मानस आहे. या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकांची मदत केल्याबद्दल सोनू सूदचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते.
प्राप्त माहितीनुसार सोनूने आपली काही संपत्ती आधीच गहाण ठेवलेली आहे. दिनांक १५ सप्टेंबर रोजी त्याने करारावर सह्या केल्या आणि २४ नोव्हेंबर रोजी हा करार रजिस्टर केला आहे. सोनूची ही बिल्डींग ए.बी.नायर रोड, जुहू या ठिकाणी आहे.
वेस्ट इंडिया रेसीडेंशियल सर्व्हिस जेएलएल इंडिया चे रितेश मेहता सांगतात, “सोनुचे हे पाउल खूप साहसी आहे. मालमत्ता गहाण ठेवल्यानंतरसुद्धा त्याची मालकी सोनू आणि त्याच्या पत्नीच्या नावेच असेल तसेच या मालमत्तेतून येणारे भाडेसुद्धा त्यांनाच मिळत राहील. मात्र गहाण ठेवल्यानंतर मिळालेले १० कोटी रुपयांचे कर्ज त्यांना व्याजासहित फेडावे लागेल.” सोनूने कोरोना लॉकडाऊन च्या दरम्यान प्रवासी मजुरांच्या गावी जाण्याची सोय केली होती. याशिवाय अनेकाना पीपीई किट्स उपलब्ध करून दिल्या होत्या. हजारो लोकांना भोजनसुद्धा दिले होते.
ऑगस्ट महिन्यात सोनू सूद ने ट्वीटरवर लिहले होते की ‘आज मला ११३७ इमेल्स, १९ हजार फेसबुक मेसेजेस, ४८१२ इन्स्टाग्राम मेसेजेस आणि ६७४१ ट्वीटर मेसेजेस द्वारे लोकांनी मदत मागितली आहे. रोज मला जवळपास इतकेच लोक मदत मागतात. यांच्यापर्यंत पोचणे माझ्यासाठी शक्य आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. शक्य तितक्या लोकांना मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. जर कुणापर्यंत मी पोचू शकलो नाही तर मला क्षमा करा,”