गदिमा : एक बहुपेडी व्यक्तिमत्व
……..
लक्ष्मण महाडिक
निव्वळ काम करणारा माणूस मजूर ठरतो.हात आणि बुद्धीने काम करणारा कारागीर ठरतो.तर हात,बुद्धी,आणि मनाने काम करणारा माणूस कलाकार ठरतो. थोडक्यात जीवनाला कलेचे रंग दिले .आयुष्य सुंदर बनवता येतं. जे करायचे ते मनापासून केल्याने जीवनात यश नक्कीच मिळतं. आयुष्य जगण्याच्या धडपडीत संघर्ष करणा-या आणि कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी अविरत कष्ट करणा-या ध्येयवेड्या माणसाची अर्थात आधुनिक महाकवीची संक्षिप्त जीवन गाथा आपल्या समोर ठेवत आहे. निमित्त आहे त्यांच्या जन्म दिनाचे. ते महाकवी म्हणजे ‘गदिमा’ अर्थात गजानन दिगंबर माडगूळकर.
गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच ‘गदिमा’ .अनेक विशेषणांची बिरुदावली त्यांच्या नावापुढे लावली जाते. मराठी साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव. सुप्रसिद्ध महाकवी , पटकथाकार ,संवाद लेखक, गीतकार, अभिनेता अशा विविध कलाक्षेत्रांमध्ये गदिमांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्यक्षेत्रात ‘ गीतरामायणासारख्या ’ आपल्या अतुलनीय साहित्यकृतीने कोटयवधी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर अधिराज्य गाजविले. आणि आजही तेवढ्याच लोकप्रियतेच्या शिखरावर त्यांचे गीतरामायण आहे. माणदेशातल्या आटपाडी परिसरातील शेटेफळ या गावी एका सामान्य कुटुंबात आजोळी १ आक्टोबर १९१९ रोजी गदिमांचा जन्म झाला. गदिमांचे आजोबा म्हणजे त्यांच्या आईचे वडील हे त्या गावचे कुलकर्णी होते. हे गाव आणि हा परिसर तसा सातत्याने माणदेशात दुष्काळाच्या छायेखाली राहणारा. गदिमांच्या आईने पोटी पुत्र व्हावा म्हणून नुसती खडीसाखर खाऊन सोळा सोमवाराचं व्रत केलं . शिवकृपेने त्यांना मुलगा झाला. आणि तो जन्मताच मेलेला. गदिमांच्या आईचं नांव बनुताई. गदिमांच्या जन्मवेळी बनुताईंच्या प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यांचे वडील चिंताक्रांत होऊन अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. त्या काळात प्रसूती घरीच होत असे. तेवढ्यात घराच्याबाहेर बाळंतपण करणारी सुईण आली. त्यांना कोणीतरी विचारलं. “काय हो काय झालं?”. तेव्हा त्या तत्काळ उतरल्या.” झालं पण देवानं दिलं पण कर्मानं नेलं.” तेव्हा आजोबा म्हणाले , “बाळंतणीला सांभाळा. तो मासाचा गोळा परसदारी निजून टाका ”. परसदारी कुदळ-फावडे वाजायला लागली. खड्डा तयार होऊ लागला. आईला अजून पूर्ण जाग आली नव्हती. इकडे म्हातारी मात्र चिंताक्रांत झाली होती. तासाभरात मातीखाली हा मासाचा गोळा बुजवला जाणार, शेवटचा प्रयत्न म्हणून तिने शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला. आणि बाळाच्या बेंबी जवळ नेला. आणि काय चमत्कार बाळाने टाहो फोडला. एका क्षणात बाळ जिवंत आहे. मूल जिवंत आहे. परसदारातील खड्डा खोदणा-या कुदळी जागच्या जागी थांबल्या. माणसं घराकडे वळली.
इकडे सगळीकडे आरडाओरड सुरू झाला . सर्वत्र आनंदीआनंद झाला. पुढचे महाकाव्य लिहिण्यासाठी एका महाकवीचा हा जन्मानंतरचा पुन्हा जन्म होता . गदिमांच्या जन्माची एक वेगळीच कथा आहे. त्यांचे बालपण अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेले.त्यांचे वडील औंध संस्थांमध्ये कारकुनी करत. त्यांचे शालेय शिक्षण हे माडगूळ ,आटपाडी ,कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी त्यांनी चित्रपट व्यवसायात पाऊल ठेवले. विद्यार्थी दशेपासूनच लिहिण्याचा छंद होता. नकला करण्याची आवड होती. या सर्व पूर्ण सुरीच्या कलांचा त्यांच्या जीवनाला हातभार लागला. वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी घरच्यांना आधार व्हावा, आर्थिक हातभार उचलला जावा या जाणिवेतून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला .सुरुवातीला ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’, यासारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या भूमिकाही त्यांनी केल्या. ‘पहिला पाळणा’ या चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी प्राप्त झाली.
आणि पुढे ‘गदिमा’ या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राट बनले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक ,गीतकार ,अभिनेता, निर्माता अशा सर्व क्षेत्रात त्यांनी आपलं नाव कोरलं. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा, दोन हजार पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये विशेषत: ‘राम जोशी,’ ‘वंदे मातरम’, ‘पुढचं पाऊल,’ ‘गुळाचा गणपती’, ‘लाखाची गोष्ट,’ ‘पेडगावचे शहाणे’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘मुंबईचा जावई’, ‘देवबाप्पा’, यासारख्या मराठी चित्रपटानी त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. मराठी गीत निर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे .त्यांची प्रतिभा सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना, यामुळे ते सर्वश्रेष्ठ गीतकार ठरले. प्राचीन मराठी काव्याला गदिमांनी अधिक समृद्ध केले.मराठी संत काव्यातील आंतरिक भक्ती,पंडितांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील मनाला भिडणारा लय, ताल,आणि शब्दांवरील असामान्य प्रभुत्व , त्याच बरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून गदिमांची अनेक गीते लोकप्रिय झाली.
गदिमांच्या कथा आणि गीतांमध्ये जगण्याचं तत्वज्ञान सहज सोप्या शब्दांमध्ये साकार झालेले दिसून येते. ‘ दैवं जात दुःखे भरता दोष ना कुणाचा.. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ’ या काव्यपंक्ती मानवी जीवनाचं सार सांगून जातात. किंवा ‘जगाच्या पाठीवर’ मधले गाणे पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्या सारखे वाटत राहते. ‘ इथे फुलांना मरण जन्मता … उद्धवा अजब तुझे सरकार ’ किंवा ‘एक धागा सुखाचा … शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा … तुझिया आयुष्याचे ’ किंवा ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे … मासा माशास खाई, कुणी कुणाचे नाही राजा .. कुणी कुणाचे नाही’ या सारखी कटूसत्य सांगणारी गीते त्यांनी लिहिली .विशेष म्हणजे ‘कोणी कुणाचे नाही ’ हे गीत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी लिहिले.तसेचगोरी गोरीपान ,एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ,मामाच्या गावाला जाऊया, यासारखी लहान मुलांच्या तोंडी असणाऱ्या गीतापासून ते ‘नाच रे मोरा ’ यासारख्या अनेक बालगीतांनी बालमनाबरोबर मोठ्यांना संमोहित केले.त्यांची चित्रपट गीते म्हटली तर ‘एक धागा सुखाचा,’ ‘जग हे बंदीशाळा’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘राजहंस सांगतो’ . ‘नभी दाटल्या’ ,’बुगडी माझी सांडली गं,’ ‘फड सांभाळ तुर्याला आला,’ किंवा ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी,’ ‘विठ्ठला तू वेडा कुंभार,’ यासारखी हजारो गीते गाजली. ‘माझा होशील का?,’ यासारखे गाणे दक्षिण भारतीयांपर्यंत पोहोचले. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गाणे होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी २५ पटकथा लिहून आपला वेगळा ठसा उमटवला. .शांताराम यांचा ‘दो आखे बारह हात’ किंवा राजेश खन्नाचा ‘अवतार’ या चित्रपटांच्या मूळ कथा गदिमांच्याच. मास्टर विनायक दिग्दर्शित गाजलेल्या १९३८ सालच्या ‘ब्रह्मचारी ’या चित्रपटात गदिमांनी पहिली भूमिका केली .आणि त्या भूमिकेने गदिमांना सर्वदूर पर्यंत पोहोचवले .खरंच चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा हा त्यांचा प्रारंभ होता .एक कलावंत म्हणून साहित्य विषयक लेखनाचे जे संस्कार झाले ,ते म्हणजे मराठी भाषेल पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिले ते सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे . खांडेकर यांचा सहवास गदिमांना मिळाला. त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं .गदिमांनी खांडेकरांचे लेखनिक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्या कामाचाच खरा संस्कार त्यांच्या मनावर झाला. त्यातूनच गदिमा बोलते ,लिहिते झाले आणि त्याच बरोबर चालते झाले. वि. स. खांडेकर यांच्या सहवासामध्ये अनेक साहित्यावर चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली .अनेक पुस्तके त्यांच्या वाचनात आली. बौद्धिक खाद्य त्यांना या रूपाने संस्कारक्षम वयात मिळाले.
खांडेकरांच्या सहवासामध्ये गदिमांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याला चांगले पैलू पाडता आले. पुढे नवयुग चित्रपट लिमिटेड या चित्र संस्थेमध्ये ते नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. ही संधी त्यांना मिळाली तेव्हा चित्रपट कसा तयार करतात. चित्रपट लेखन कसं होतं. संवाद लेखन कसं होतं . दृश्य लेखन कसे केले जाते. या सगळ्या गोष्टींची जाणीव त्यामुळे झाली. त्यातून गदिमांच्या चित्रपट लेखनाला ,संवाद लेखनाला ,गीत लेखनाला एक वेगळे रूप आणि गती मिळाली. पुढे आचार्य अत्रे यांच्या सोप्या व प्रसाद रचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. चित्रपटात लिहिण्याची संधी गदिमांना मिळाली. राजकमल पिक्चर्स कंपनीच्या ‘लोकशाहीर राम जोशी ’ हा चित्रपट १९४७ साली अगदी स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आला .विशेष म्हणजे तो खूप गाजला. या चित्रपटाची कथा ,संवाद आणि सर्व गीते गदिमांनी लिहिलेली होती. आणि त्या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. या चित्रपटाला अमाप लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक या दोन्ही नात्यांनी गदिमा हे मराठी चित्रपट सृष्टीचे एक भक्कम आधारस्तंभ बनले.
गदिमांनी पंधरा हिंदी चित्रपटांसाठी काम केले. त्यांच्या चित्रपटांच्या कथा पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या. ‘ युद्धाच्या सावल्या’ या नावाचे नाटक त्यांनी १९४४ साली लिहिले. विशेषतः ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी ‘जोगिया’हा काव्यसंग्रह १९५६ मध्ये प्रसिध्द झाला.तो सर्वत्र गाजला. ‘गीत-रामायण ‘, ‘गीत सौभद्र’, ‘कृष्णाची करंगळीम’, ‘तुपाचा नंदादीप’, ‘चंदनी उदबत्ती’, ‘आकाशाची फळे’ नावाची कादंबरी आणि ‘मंतरलेले दिवस’ हे आत्मचरित्र प्रसिध्द झाले. त्यांच्या साहित्यावर म्हणजेच लेखनावर विशेषत: ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम ,एकनाथ या संत साहित्याच मोठा प्रभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे शाहिरी काव्याचेही चांगले संस्कार झाल्याचे स्पष्ट दिसते. या सगळ्यांचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतांमधून येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणा मागे हे संस्कार उभे असल्याचे दिसते. त्यांचे बालपण हे ग्रामीण भागामध्ये गेले. तिथल्या लोकांच्या बोलीभाषा, तिथली बोली, तिथले शब्द ,तिथले संवाद ,तिथल्या माणसांचे स्वभाव हे गदिमांनी फार सुंदर रितीने टिपले. मराठमोळेपणाचा हा संस्कार गदिमांच्या विशेषत: कथा, कविता लेखनात प्रकर्षाने जाणवतो. विशेष म्हणजे सर्व मराठी रसिकांनी गदिमांना उचलून घेतले.
त्यांचे ‘गीत रामायण’ म्हणजे त्यांच्या किर्तीचा कळस होता. गदिमांना ‘महाकवी आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी त्यांच्या ‘गीतरामायणाने’ त्यांना बहाल केली. गदिमांच्या गीतांना तितक्याच सहजतेने,तन्मयतेने बाबुजींनी अर्थात सुधीर फडके यांनी चाली लावल्या .‘गीत रामायण’ हा एकच कवीने वर्षभर व एका संगीतकाराने संगीतबद्ध केलेला , पुणे आकाशवाणीने सादर केलेला कार्यक्रम होता.मराठी मनाला या उभयतांनी दिलेली सुंदर,अवीट अशी मेजवानी होती. त्यावेळी श्रीकांतला नावाचे गदिमांचे मित्र पुणे आकाशवाणीत कार्यक्रम नियोजन अधिकारी म्हणून आले होते. नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला. आणि ‘गीत रामायणा’ सारख्या अजरामर अशा एका महाकाव्याचा जन्म झाला .
रामायणात वाल्मिकींनी अठ्ठावीस हजार श्लोकात राम कथा लिहिली. तीच रामकथा एकूण ५६ गीतात गदिमांनी शब्दबद्ध केली. गीत रामायणाचे आजपर्यंत हिंदी ,गुजराथी ,कन्नड ,बंगाली ,असामी ,तेलुगू, मल्याळी, संस्कृत आणि कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत. गीतरामायणात विविध रसांचा उत्कर्ष होता .रौद्र, भयानक ,अद्भुत,वीर रसांचे प्रसंग त्यात आहेत. सर्वच रामायण नितांत मधुर आहे .. रामायणातील सगळेच गीते मधुर आहेत. ती घोळून घोळून म्हणण्याचा मोह पडल्याशिवाय श्रोत्याला राहत नाही. तथापि काही गीतांना अशी चाल लागली आहे आणि त्यांचा असा रंग उतरला आहे की तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो .तो प्रसंग घडतो आहे अशाच भावना बळावून श्रोत्यांची शरीरे हालचाली करू लागतात.
राम जन्माचे गीत पहा प्रजाजनांना वाटणारा आनंद या गीतातून ओसंडून जात आहे . राम होडीतून नदी पार करण्यासाठी नावाडी होडी वल्हवू लागतो आणि ‘जय गंगे जय भागिरथी ’ची गोष्ट करतो त्यावेळी आपण स्वत: होडीत बसल्याचा भास मनात झाल्याशिवाय राहत नाही. किंवा ‘सेतू बांधा रे सागरी’ ही गर्जना जेव्हा होते तेव्हा आपल्याला जोश आल्याशिवाय राहत नाही. किंवा ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ?’असा सीतेचा करूण प्रश्न ऐकून आपले डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. ‘गीत रामायणा’ बद्दल माडगूळकर यांच्या शब्दात सांगायचे तर “ हे काव्य नव्हे हा अमृतसंचय आहे . विधात्याने माझ्या हातून हे लिहून घेतले .हे अमृत आहे. असेच मी मानतो.” गीत रामायणाच्या गायनाचे कार्यक्रम त्यावेळी झाले आणि आजही होत आहेत. अन्य भारतीय भाषांमध्ये गीतरामायणाचे अनुवादही झाले.
गदिमांच्या ‘जोगिया’ ‘मंतरलेले दिवस’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. त्यांच्या अनेक चित्रपटांना कथा, पटकथा, संवाद, व गीत लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे व केंद्र सरकारचे चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ते संगीत नाटक अकादमीचा ‘विष्णुदास भावे ’ गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. भारत सरकारने त्यांना १९६९ साली ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. १९७३ साली यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले . विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे ते १९६५ ते १९७४ असे बारा वर्षे सदस्य होते .विधानपरिषदेत गदिमांचे भाषण म्हणजे ऐकणा-यासाठी मेजवानीच असायची.ते ऐकण्यासाठी विधानसभेतील अनेक आमदार विधान परिषदेत येऊन बसत.
तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते. गदिमांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता.गदिमांवर खूप मोठ्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यात अठराविश्व दारिद्र्यामुळे गदिमांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता अनेक शाहिरी कवणे ,पोवाडे लिहून जनजागृती केली .सातारा-सांगली भागात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहीर शंकर निकम सारख्या शाहिराला त्यांनी अनेक कवणे लिहून दिली. त्यांच्या गीतांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पेटून उठला. गदिमांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला .त्यवेळी गदिमांनी पोवाडे ‘भगवान ’ या टोपण नावाने लिहिले होते.
कळत न कळत ते कॉंग्रेस पक्षाशी जोडल गेले. तरी पण त्यांचे मित्रपरिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता .अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असो की शरदरावजी पवार असो किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांना ते आपले वाटायचे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साई बाबांच्या नावाने ओळखली जाते. आज जगभरातून व देशभरातून अनेक शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात नियमितपणे काकड आरती होते. ती काकड आरती गदिमांच्या लेखणीतून उतरली आहे. या काकड आरतीगीतांसाठी गदिमांनी ‘राम गुलाम ’ हे टोपण नाव धारण केले होते. आणि विशेष म्हणजे या आरतीगीताला सुप्रसिध्द संगीतकार सी.रामचंद्रन यांनी अतिशय सुंदर अशी चाल लावली . दि .१४ डिसेंबर १९७७ रोजी गदिमांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी महाराष्ट्रातून व परप्रांतातून त्यांचे रसिक, वाचक ,साहित्यिक मित्र आले होते. त्यामुळे संपूर्ण पुण्याच्या रस्तोरस्ती माणसांची गर्दी होती. इतकी गर्दी यापूर्वी पुण्याने कधी पाहिली असेल असे वाटत नाही किंवा यानंतरही बघायला मिळाली असेल असे वाटत नाही. गदिमांना एकूण ५८ वर्षांचे आयुष्य लाभले.ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यातून, साहित्यातून, चित्रपटातून ‘गीत-रामायणातून’ मराठी रसिकांच्या वाचकांच्या हृदयामध्ये विराजमान आहे.
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन….!!
गदिमा म्हणजे एक विद्यापीठ होते..
त्यांच्या कार्याचा सुंदर परिचय मिळाला.
महाडिक सर धन्यवाद..