नाशिक – शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये कोरोना बद्दलची वैज्ञानिक जागृती निर्माण करावी व रॅपिड अँटीजेन शिबिरांचे आयोजन करावे. या आयोजनाकरिता आवश्यक मोबाईल व्हॅन, आरोग्य गट व साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन बीजेएस चे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला व दीपक चोपडा यांनी केले
नागरीकांनी सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज असून कोरोनाचा प्रादुर्भाव कामगार वस्ती, मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय व व्यापारी वस्ती मध्ये वाढत आहे. नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे पुढाकाराने “मिशन झिरो नाशिक” उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत लक्षणे असलेल्या व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत असून या मोहिमेच्या आजच्या ३० व्या दिवशी १२९४ नागरिकांनी आपल्या अँटीजेन चाचण्या करून घेतल्या व त्यापैकी २९६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्यात. आजपावेतोच्या मिशन झिरो नाशिक अभियानात एकाच दिवसात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येण्याचा आजचा दिवस आहे.
आज पावेतो या मोहिमेंतर्गत एकूण ४१३२८ अँटिंजेन चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी ५५८३ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे या मधील मुख्य बाब म्हणजे या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. एकूण चाचण्यां पैकी ३५७४५ रुग्णांना कोरोनाच्या भितीतून मुक्त करण्यात व दिलासा देण्यास हे अभियान यशस्वी झाले आहे व त्याचे प्रमाण एकूण झालेल्या चाचण्यांपैकी ८६.४९ % येते. चाचणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची कोरोना बद्दलची भिती दूर होऊन त्यांना दिलासा मिळत आहे.