गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव महात्म्य…..
पंडित दिनेश पंत
येत्या १५ फेब्रुवारीला गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात… आद्य देवता भगवान गणेश अर्थात गणपती च्या जन्मानिमित्त प्रत्येक वर्षी माघ शुक्ल चतुर्थी दिवशी ही जयंती साजरी केली जाते. बऱ्याच ठिकाणी गणेश जयंती सप्ताह स्वरुपात साजरी केली जाते. या सप्ताहात दिवसभर गणपती मंदिरामध्ये काकड आरती मध्यान आरती शेजारती सह पूजा-अर्चा अथर्वशीर्ष पठण केल्या जातात. मोठ्या संख्येने गणेशभक्त या सप्ताहात उपवास ठेवतात व गणेश जयंतीच्या दिवशी त्याची सांगता करतात.. गणेश जयंतीच्या दिवशी गणपती दर्शन अष्टविनायक दर्शन गणपतीला २१ दुर्वा जास्वंद बेल फुल वाहणे तसेच ओम गं गणपतये नमः हा जप करण्यास विशेष महत्त्व आहे. अनेक घरी गणेश याग हवन गणपती अथर्वशीर्ष पठण गणेश स्तवन तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन उत्सव साजरा केला जातो. गणेशाला ओंकार स्वरूप मानले गेले आहे. ओंकार म्हणजेच जीवनातील चैतन्य त्याचप्रमाणे गणपती ही बुद्धिदेवता आहे. अथर्वशीर्षात गणपतीचे वर्णन करताना” त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि “त्वमेव केवलम कर्तासी” त्वमेव केवलम हर्तासी “त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि” त्याचप्रमाणे” त्वम ज्ञान मयो विज्ञान मयोसि” त्याचप्रमाणे “त्वम आनंद मयस्तं ब्रह्म मया” असे गणपतीचे वर्णन आढळते. अर्थात तूच सर्व कर्ताधर्ता आहेस, तूच संकटाचे हरण करतोस, तूच साक्षात ब्रह्म आहेस, आणि तूच ब्रह्मानंद ही आहेस, तूच ज्ञान आहेस, तूच विज्ञानही आहेस, तूच प्रत्येकामध्ये असलेले जीवन तत्व आहेस…. गणेश जयंती निमित्त अनेक ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात गणेश पालखी उत्सव परिक्रमा केली जाते. या दिवशी गणपतीला अकरा एकवीस गुळ खोबरे मोदक तसेच उकडीचे मोदक याचा नैवेद्य दाखवला जातो. गणेश जयंती पासून गणेश भक्त वार्षिक चतुर्थी उपवास सुरुवात करतात तर काही जण या दिवशी सांगता करतात..