नवी दिल्ली – स्वीडनच्या एका कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित एका कंपनीला एक लक्झरी बस दिल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गडकरी यांनी हे आरोप फेटाळून लावले असून याविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी बस कराराशी संबंधित घोटाळा चिंतेचा विषय असल्याचे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. सार्वजनिक जिवनात सभ्यतेच्या गोष्टी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. सरकार याची दखल घेईल अशी आशा आहे.
आपल्या इतर घोटाळ्यांप्रमाणे या घोटाळ्यावर पडदा टाकणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेसने काही छायाचित्रेही पत्रकारांना सोपवली. त्यात स्वीडीश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी गडकरींसोबत दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या एका अधिकृत प्रतिक्रियेत हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. स्कॅनिया बसशी संबंधित प्रकरण पूर्णपणे स्वीडीश कंपनीचा अंतर्गत विषय आहे, असेही यात म्हटले आहे. स्कॅनियाच्या प्रवक्त्यांनीही गडकरी व त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा बसच्या खरेदी किंवा विक्रीशी देणेघेणे नाही, असे स्पष्ट केले आहे.
विदेशी माध्यमांनी आरोप लावू नये
स्कॅनियाच्या प्रवक्त्यांनी गडकरी व त्यांच्या कुटुंबावर निराधार आरोप लावू नये, असे आवाहन विदेशी माध्यमांना केले आहे. अकारण गडकरींच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर पाऊल उचलण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.