नाशिक – कुटूंबिय गच्चीवर झोपण्यासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोघा भावांचे बंद बंगले फोडून सव्वा दोन लाखाचा ऐवजावर डल्ला मारला. त्यात ६५ हजाराची रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही घटना नाणेगाव ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामकृष्ण काळे (रा.दत्तमंदिर शेजारी,भवानीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विजय काळे व त्यांच्या भावाचा लागून दोन बंगले आहेत. उकाडा वाढल्याने काळे कुटूंबिय सोमवारी (दि.८) रात्री आप आपल्या बंगल्यावर झोपण्यासाठी गेले असता ही घटना घडली. बंद बंगल्याचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही बंगल्यांच्या बेडरूमधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे आणि रोकड असा २ लाख २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.
………
नकोशीचा परित्याग, गुन्हा दाखल
नाशिक : काही तासांपूर्वी जन्मास आलेल्या नकोशीचा परित्याग करीत अज्ञात महिलांनी तिला उघड्या चेंबरमध्ये टाकल्याची घटना पंचक गाव परिसरात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलचंद गुप्ता (रा.वडाळागाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पंचकगावातील महादेव मंदिरा पाठीमागील उघड्या चेंबरमध्ये मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास नुकतेच जन्मास आलेले स्त्री जातीचे अर्भक मिळून आले. अज्ञात दोन महिलांनी नकोशीचा परित्याग करीत तिचा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने उघड्या चेंबर मध्ये टाकून दिले असल्याचे बोलले जात असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.
……………
क्रेनने धडक दिल्याने पादचारी ठार
नाशिक : अपघातग्रस्त वाहन उचलण्याच्या क्रेनने धडक दिल्याने अनोळखी पादचारी ठार झाला. हा अपघात महामार्गावरील एक्स्लो पॉईंट भागात झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार रविवारी (दि.७) हा अपघात झाला. अंबड औद्योगीक वसाहतीतील पॅम्स सिस्टीम या कारखान्या समोर झालेल्या या अपघातात ५० ते ५५ वयोगटातील पादचारी ठार झाला. अंबड अॅटो कडून एक्स्लो पॉईंट नजीकच्या तहेरी हार्डवेअरच्या दिशने भरधाव जाणा-या एमएच १५ एयू ८५२३ या अपघातग्रस्त वाहनांना उचलणा-या क्रेनने अनोळखी पादचा-यास धडक दिली. या अपघातात सदर इसम गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. हवालदार मारूती भड यांच्या तक्रारीवरून क्रेन चालक बाळू शेलार (रा.अंबड लिंकरोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
……..
चक्कर येवून पडल्याने वृध्दाचा मृत्यु
नाशिक : चक्कर येवून पडल्याने ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. ही घटना आडगाव फाटा येथील उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दयाराम दगा पगारे (७० रा.शिंदे मळा,आडगाव पोलीस मुख्यालयापाठीमागे) असे मृत वृध्दाचे नाव आहे. पगारे सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास आडगाव फाटा भागात आले होते. उड्डाणपुलाखाली ते चक्कर येवून पडल्याने नागरीकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.