मुंबई – आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपटाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. गंगूबाईचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांनी ही तक्रार दाखल केली आहे. संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, भन्साळी प्रॉडक्शन, लेखक हुसेन जैदी आणि पत्रकार जेन बोर्गिस या सर्वांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी शूटिंग थांबवण्याचीही मागणी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
अद्याप या चित्रपटाचे चित्रीकरण अर्धे देखील झालेले नाही, तोवर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’, या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले असून रात्रीचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित शूटिंग पूर्ण करण्याआधीच ही तक्रार दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगूबाईच्या मुलाने हे पुस्तक वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. पान क्र. ५० ते ६९ वरील मजकूर हा चुकीचा असून तो आमच्या व्यक्तिगत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणारा असल्याचे बाबूजी यांचे म्हणणे आहे. चित्रपटातून काही प्रसंग गाळण्यासोबतच या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी बाबूजी शाह यांनी केली आहे. बाबूजी शाह यांचे वकील नरेंद्र दुबे यांनी सांगितले की, ते संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि इतर लोकांविरोधात मानहानी झाल्याबद्दलही केस करू शकतात.