मुंबई – संजय लिला भंसाळीचे दिग्दर्शन असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी चर्चा पुढे आली आहे. या सिनेमात आलिया भट मुख्य भूमिकेत असल्यामुळे तसाही हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. परंतु, आता डिजीटल राईट्सच्या मुद्यावरून चित्रपटाची चर्चा होतेय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मचे राईट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे. त्यासाठी नेटफ्लिक्सने मोठी किंमत दिली असल्याचे समोर आले आहे.
गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट एस. हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन्स आफ मुंबई या पुस्तकातील एका भागावर आधारित आहे. आलिया गंगुबाईच्या भूमिकेत असणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे प्रदर्शित थांबविण्यात आले. आता या वर्षात हा सिनेमा रिलीज होईल, असे संकेत निर्मात्याने दिले आहेत.
प्रॉडक्शन हाऊसने एका ट्वीटरद्वारे त्याची माहिती दिली आहे. पण याहीपेक्षा जास्त महत्त्वाची बाब नेटफ्लिक्सची आहे. त्यांनी गंगुबाई काठियावाडीचे अधिकार तब्बल ७० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. बॉलीवूड हंगामा या संकेतस्थळावरून ही माहिती उघड करण्यात आली आहे. संजय लिला भंसाळी आणि आलिया भट या दोघांकडे बघून नेटफ्लिक्सने ही हिंमत केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात शांतनू माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज यांच्यासारखे दिग्गज कलावंत आहेत. तर अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि हुमा कुरेशी यांची स्पेशल एन्ट्री असणार आहे.
याशिवाय एसएस राजामौलीच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातही आलिया भटची मुख्य भूमिका असेल. इथेही अजय देवगण स्पेशल अपिअरन्समध्ये असेल. २०२१ चा हा सर्वांत मोठा सिनेमा असेल असे बोलले जात आहे. १३ ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे दक्षिणेतील सूपरस्टार मुख्य भूमिकेत असतील. आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिकेत असेल.