नाशिक – गंगापूर धरणालगत लवकरच सायकल ट्रॅक होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
जाधव यांनी सांगितले आहे की, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून MTDC मार्फत गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला बोट क्लब व पर्यटन केंद्र विकसित झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथे पर्यटनस्थळ विकसित होण्यासाठी व नाशिक परिसरातील सायकल प्रेमी जनतेला व्यायामासाठी गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला सायकल ट्रॅक विकसित करणे शक्य आहे. हे धरण बांधताना ब्रिटीश लोकांनी गंगापूर धरणाच्या पाण्यालगत जादा पूर क्षेत्रासाठी (HIGH FLOOD LIFT) अतिरिक्त जागा भूसंपादन करून ठेवलेली आहे. या बॅक वॉटर लगत गिरणारे, नागलवाडी, पिंपळगाव गरुडेश्वर, ओझरखेड, गणेशगाव, गंगावऱ्हे, सावरगाव….इत्यादी गावे येतात. या सर्व गावामधील गंगापूर धरणाच्या पाण्या लगतची साधारणपणे १०० मीटर रुंदीची जागा जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी धरणाच्या पाण्यालगत ९ मीटर रुंदीचा ट्रॅक सायकल विकसित करणे शक्य आहे.
नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणाचे बॅक वॉटरला जलसंपदा विभागाच्या ताब्यातील जागेत सायकल ट्रॅक प्रस्तावित करावा असा प्रस्ताव जाधव यांनी भुजबळ यांना सुचविला. त्यानंतर हा प्रस्ताव पुढे पर्यटनमंत्री ठाकरे यांचेकडे पाठविण्यात आला. ठाकरे यांना ही संकल्पना आवडली असून त्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पर्यटन विभागास दिले आहेत.
अशा पद्धतीने सायकल ट्रॅक लेकच्या कडेला इंग्लंड, फ्रांस, इटली, स्वित्झर्लंड या देशात अस्तित्वात आहेत.
त्यामुळे नाशिकला येणारे पर्यटक सकाळी या सायकल ट्रॅक उपभोग घेऊ शकतील. तसेच नाशिक मधील सायकलच्या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू, सायकलद्वारे व्यायाम करणारे लोक यांना या गोष्टीचा लाभ होऊ शकेल. तसेच नवीन पर्यटक त्या निमित्ताने नाशिककडे आकर्षित होतील. तसेच टाटा आयोजित मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धेसारखी नाशिकला भरवता येऊ शकेल. सदरच्या प्रस्तावाची ठाकरे यांनी प्रशंसा करून सायकल ट्रॅकसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पर्यटन विभागाला दिले असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.