नाशिक – जुने नाशिकमधील खडकाळी भागात राहणारे सहा ते सात मित्र गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यात दोघा अल्पवयीन मित्रांचा जलाशयात सोमवारी सायंकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
शाळांना सुटी असल्याने सोमवारी हे सर्व मित्र सकाळी दुचाकींवरून फिरायला गेले होते. सकाळ पासून सांयकाळ पर्यंत ते फिरत होते. त्यानंतर त्यांनी सुर्यास्त बघून घरी जाण्याचे ठरवले. यावेळी त्यांना फोटो काढायचे होते. पण, हे फोटोच या मित्रांना महागात पडले. फोटो काढतांना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम शेख (१५) , दोघे रा.खडकाळी, त्र्यंबक पोलीस चौकीमागे हे अचानकपणे पाण्यात पडले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला मात्र पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही मित्रांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले, पण, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडालेले होते.
मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिकांना सांगून मदतीला बोलावले. त्यानंतर काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात उतरले. त्यांनी शोध सुरु केला. पण, अर्ध्या तासानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेहच हाती आला. या दोघां तरुण मुलांच्या मृत्युने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे