नाशिक शहरात विविध दाखल झालेले गुन्हे असे
गंगापूररोडला घरफोडी; टीव्ही आणि सिलेंडरची चोरी
नाशिक – बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरट्याने एलईडी, दोन गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा प्रकार रविवार (दि. ६) दुपारी गंगापूर रोड परिसरात घडला. याप्रकणी आकाश प्रभाकर आहेर (रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. रविवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास आहेर यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व एलईडी टीव्ही, दोन गॅस सिलेंडर असा अठराशे रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक पवार तपास करत आहे.
भरधाव कारची दुभाजकास धडक
नाशिक – दारूच्या नशेत चालकाने कार भरधाव वेगाने चालवून दुभाजकास धडदिल्याने यात कारचे नुकसान झाले असून पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. जयेंद्र जयसिंग मकवाना (रा. मुंबई नाका) असे संशयित कार चालकाचे नाव आहे. हवालदार माधव सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ६) मकवाना हा कार क्र. (एमएच १५ डीएस ७०९५) घेवून दिडोंरी रोडने तारवाला नगरकडून दिडोंरी नाक्याकडे धरधाव वेगाने येत होता. यावेळी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळल्याने कारचे नुकसान झाले. पोलिसांनी जयेंद्र मकवाना यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक डी. एम. बैरागी तपास करत आहे.
तलवारी बाळगणारा गजाआड
नाशिक – बेकायदेशीर रित्या तलवारी बाळगणार्या एका अल्पवयीन संशयितास शनिवार (दि.५) रात्री पोलीसांनी ताब्यात घेलते आहे. याप्रकरणी हवालदार सुनील पुंजाजी भालेराव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शनिवार रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास संशयिताची मोटारसायकल क्र. (एमएच १५ एफझेड २३२८) च्या सिटच्या आड दोन तलवारी बॅनरमध्ये गुंडाळून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण तपास करत आहे.
चाकूधारी अटक
नाशिक – शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंनन करत बेकायदेशीर रित्या धारदार चाकू बाळगणार्यास अटक करण्यात आली असून त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण आण्णा कडुसकर (रा. अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस शिपाई तुळशीराम शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ६) करण हा अंबडगाव येथील बस स्थानकावर असताना त्याच्याकडे चॉपर अढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार जेरबंद
नाशिक – दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले असताना कोणतीही पुरवानगी न घेता शहरात वास्तव्य करणार्या संशयितास पोलीसांनी जेरबंद केले आहे. राहूल उत्तम शिंदे (रा. फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित राहूल शिंदे यास पोलिसांनी दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, तरीही कोणतीही पुर्व परवानगी न घेता शिंदे हा निलगीरी बाग येथे पोलिसांना रविवारी (दि. ६) आढळून आला. त्यास ताब्यात घेतले त्यावर आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार नरवडे अधिक तपास करत आहे.