टोरंटो – कॅनडाचे एक मंत्री नाताळाच्या दिवशी लॉकडाऊनचा नियम मोडत सुट्ट्या एन्जॉय करीत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे मंत्रीपदच काढून घेण्यात आले. त्यामुळे ख्रिसमसचे सेलिब्रेशन त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
ओंटेरियोचे अर्थ मंत्री रॉड फिलिप्स नाताळाच्या सुटीचा आनंद लुटताना आढळले. त्यांचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर चांगलाच वादंग उठला. सुट्यांवरून परत आल्यानंतर मात्र सरकारनेच त्यांना मंत्रीपदावरून काढत नाताळाचे गिफ्ट दिले. अर्थात कागदोपत्री स्वतः मंत्री महोदयांनीच राजीनामा दिला आहे. जनतेच्या टीकेला पात्र ठरलेले रॉड फिलिप्स यांना सरकारने सुट्या संपवून तातडीने कामावर परतण्याचे आदेश दिले. त्यानंतर राजीनामा द्यायला लावला. कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ओंटेरियोमध्ये २६ डिसेंबरपासून दुसऱ्यांना लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, हे विशेष.
मंत्र्याने मागितली माफी
नाताळाच्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी रॉड फिलिप्स १४ डिसेंबरलाच चुपचाप कॅनडाच्या बाहेर निघून गेले. पण सुट्यांदरम्यान आपण ओंटेरियोमध्येच आहोत, असे फिलिप्स यांनी वरीष्ठांना सांगितले होते. १६ डिसेंबरला आपल्या हॉलिडे रिसोर्टमधून एक व्हीडीयो कॉल करताना ओंटेरियो विधीमंडळाच्या इमारतीचा बनावट बॅकड्रॉप तयार करून लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केले. टोरंटोमध्ये परतल्यावर मात्र फिलिप्स यांनी आपल्याकडून चूक झाली असल्याचे सांगत जनतेची माफी मागितली. कॅनडामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ५ लाख ८१ हजार लोक संक्रमित झाले आहे. तर १५ हजार ६०६ लोकांचा मृत्यू झाला आहे.