कोरोना काळात क्रीडा विभागाकडून ऑनलाईन उपक्रमांना भरभरून प्रतिसाद
नाशिक – कोरोना काळात हेच थांबणं म्हणजे खेळाडूंच्या दृष्टीने अवघड बाब. मात्र, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूंची ही बाब हेरली आणि त्यांच्यासाठी या लॉकडाऊनचा सदूपयोग करत विविध विषयांवर कार्यशाळा घेऊन त्यांना अद्ययावत ठेवले. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन कार्यशाळा भरवून तंदुरुस्ती, क्रीडा विषयक प्रश्नमंजुषा, आरोग्य व तंदुरुस्ती, ऑलंपिक विषयक प्रश्नमंजुषा, विविध क्रीडा विषयांवर निबंध असे उपक्रम घेतले आहेत. या उपक्रमांना क्रीडापटू, क्रीडाविषयक तज्ज्ञ, तसेच याविषयी आस्था असणाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, अशी माहिती नाईक यांनी दिली.
कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर उच्चभ्रू समाजापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच जनजीवन लॉक झाले. यातील एक घटक म्हणजे खेळाडू. रोजचा सराव आणि शारीरिक कसरत हा खेळाडूंचा जणू काही श्वासच. ही बाब ओळखून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे लॉकडाऊन काळातही क्रीडाप्रेमी क्रीडाक्षेत्राला जोडून होते. मैदानात सराव करण्यास मर्यादा असल्या तरी ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून क्रीडापटूंना क्रीडा विषयाशी जोडून ठेवण्याचे काम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
याचाच भाग म्हणून ‘कार्ल रंग फिटनेस स्पोर्टस् सायन्स असोसिएशन’च्या सहकार्याने १० ते १७ एप्रिल या कालावधीत फिटनेस आणि स्पोर्टस् (आरोग्यवर्धक खेळ) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या ऑनलाईन कार्यशाळेत सुमारे ९०० लोकांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेठ तालुक्यातील दादासाहेब बिडकर आर्टस, सायन्स ॲन्ड कॉमर्स कॉलेजच्या सहकार्याने प्रश्नमंजुषा हा उपक्रम घेण्यात आला. विविध क्रीडा विषयांवरील या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १२०० लोकांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळा, प्रश्नमंजुषा
तलवारबाजी खेळाशी निगडित असलेल्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्या माध्यमातून २६ एप्रिल ते ०३ मे या कालावधीत प्रारंभीक विषयांची कार्यशाळा आयोजित केली होती. या ‘ऑनलाईन बेसिक वर्कशॉप ऑन फेन्सिंग’ या उपक्रमात १ हजार लोकांनी सहभाग घेतला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ७ मे दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या श्री सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या सहकार्याने आणि जून महिन्यात नाशिकच्या बिटको महाविद्यालयाच्या सहकार्याने प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबविण्यात आला. या दोन्ही उपक्रमांना ही क्रीडापटूंनी भरघोस प्रतिसाद नोंदविला.
निबंध स्पर्धा
आपल्या जीवनात आरोग्य व तंदुरुस्ती याचे महत्त्व विशद करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिक शहरातील सिडको येथील के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालयाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. ०४ ते १० मे या कालावधीत झालेल्या ‘हेल्थ ॲण्ड फिटनेस-वे टू लाईफ’ या कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे १५०० अधिक लोकांनी तंदुरुस्तीचे महत्त्व यावेळी जाणून घेतले. औरंगाबादमधील कन्नडच्या शिवाजी आर्टस, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेजच्या सहकार्याने ऑलंपिक विषयावरील प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातही मोठा प्रतिसाद मिळाला. कोविड प्रादुर्भावाच्या काळात तसेच कोविड प्रादुर्भाव संपल्यानंतर क्रीडा उपक्रम कसे असतील ? त्याचे आयोजन कशाप्रकारे करता येईल ? यासंबंधीची मते जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी या विषयावर निबंधाच्या माध्यमातून अनेक उपयुक्त सूचना केल्या.
कोविडच्या कठीण परिस्थितीत आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग शास्त्राचे महत्त्व नागरिकांना समजावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नाशिक शहरातील के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालयच्या सहाय्याने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कोविड काळात सातत्याने विविध उपक्रम राबवून क्रीडापटूंसह क्रीडा चाहत्यांना वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान देण्याचे काम केले आहे. या उपक्रमामुळे क्रीडापटूंना आपण आपल्या मैदानापासून दूर आहोत, हे जाणवले नाही. यासाठीच हे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी सांगितले.