नवी दिल्ली – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणारा खेल रत्न पुरस्कार वितरण समारंभ प्रथमच व्हर्च्युअल झाला आहे. ऑनलाईन झालेल्या या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खेलरत्नांचा गौरव केला. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने भारत हा खेळातील महाशक्ती बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू हे उपस्थित होते.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल, अर्जुन पुरस्कार विजेते घोडेस्वारीसाठी अजय सावंत, कुस्तीपटू राहूल आवारे, खोखोपटू सारिका काळे, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, पॅरास्विमिंग सुयश जाधव, ध्यानचंद पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
विविध क्रीडा प्रकारातील पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील खेळाडू असे – अर्जुन पुरस्कार-अजय सावंत (घोडेस्वारी), राहूल आवारे (कुस्ती), सारिका काळे (खो खो), दत्तू भोकनाळ (नौकानयन), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), सुयश जाधव (पॅरास्विमिंग) आणि ध्यानचंद पुरस्कार प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन). तर लक्ष्य इन्स्टिट्यूट (पुणे) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट (मुंबई) यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाला.