नवी दिल्ली – भारतीय नागरिकांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांपुढील व्यक्तींना (ज्यांना अनेक आजार आहेत) त्यांना कोरोना लस उपलब्ध होणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर लस पैसे देऊन घेता येणार आहे.
भारतात गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलिस आणि शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. आता कोरोना लसीचा तिसरा टप्पा येत्या १ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार आहे. तसेच, गंभीर आजार असलेल्या आणि ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाही येत्या १ मार्पासून लस मिळणार आहे. तशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
खासगी केंद्रांवरही लस मिळणार
तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी लसीकरण केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. सरकारी केंद्रांवर लस मोफत असणार आहे. तर, खासगी केंद्रांवर लसीसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. या केंद्रांवर लसीचे शुल्क किती असेल हे मात्र सरकारने जाहिर केलेले नाही. यासंदर्भात येत्या ३ ते ४ दिवसात निर्णय जाहिर केला जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/PIB_India/status/1364514931186364418