नाशिक – घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुषखबर आहे. घर खरेदी केल्यास शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आकारण्याचा निर्णय नरेडको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे. नरेडको सभासदांकडे घर खरेदी करणाऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. शहरात नरेडकोचे ५० सदस्य असून त्यांचे जवळपास २०० बांधकाम प्रकल्प शहरात सुरू आहेत. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे,
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)च्या नाशिक शाखेने घर खरेदीदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकतीच स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद म्हणून घर खरेदी करण्यास उत्साहित नागरिकांना दिलासा देण्यासाठी नरेडकोनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. नरेडको सभासदांकडे घर खरेदी करणाऱ्या नागरिकास शून्य टक्के स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. म्हणजेच ‘नरेडको’ सभासदच ३ टक्के स्टॅम्प ड्युटी भरणार आहेत. त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात नव्याने बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना दिला जाणार आहे. तशी माहिती नरेडकोचे जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, अभय तातेड, सुनिल गवादे, राजन दर्यानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विकासाला चालना मिळणार
देशाच्या विकासात बांधकाम व्यवसायाचा मोठा वाटा आहे. तसेच, कोरोनामुळे आर्थिक चक्र थांबले आहे. त्यास गती देण्यासाठी नरेडको सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शून्य टक्के स्टॅम्प ड्युटीच्या निर्णयाने बांधकाम उद्योगावर आधारित २५० पूरक उद्योगांना फायदा होऊन इतर उद्योगांबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रात चैतन्य निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे घर घेणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच, राज्याच्या महसूलात भरीव वाढ होण्याचा आशावाद नरेडको नाशिक पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
विशेष गटाची स्थापना
नरेडको नाशिकच्या ० (शून्य) स्टॅम्प ड्युटी योजनेच्या व्यापक प्रसाराकरिता विशेष गट स्थापित करण्यात येणार आहे. तळागाळापर्यंत या योजनेचा फायदा पोहचविण्याचा हेतू साध्य हॊईपर्यंत राज्य शासनाच्या विधायक उपक्रमांना भरघोस पाठिंबा देण्याचा मनोद्य नरेडको नाशिकतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
क्रेडाईकडूनही लवकरच खुषखबर
बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेली क्रेडाई ही सुद्धा नाशिकमध्ये सक्रीय आहे. नरेडकोने स्टॅम्प ड्युटी शून्य टक्के केल्याने क्रेडाईकडूनही ग्राहकांसाठी मोठी घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांचा अधिक फायदा होणार असून नाशकातील रिअल इस्टेट क्षेत्रात नवरात्री ते दिवाळी या काळात मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
????????????????????????????