मुंबई – इंजिनिअरिंग, फार्मसी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट पाच टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. याबद्दलची प्राथमिक माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आता खुल्या वर्गासाठी ४५ टक्के तर मागासवर्गासाठी किमान गुणांची अट ४० टक्के असणारी आहे. राज्य शासनयाबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे.
गेल्या काही वर्षात इंजिनिअरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे. यापूर्वी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान ५० टक्के तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुणांची अट होती. मात्र, आता त्यात बदल होणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक असणार आहेत. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आता नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे.
इंजिनीअरिंग सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी (पाच वर्षे अभ्यासक्रम), बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठी हे नियम लागू असणार आहे. इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या दरवर्षी रिक्त जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाच्या गाईडलाइन्सनुसार महाराष्ट्रात लवकरच याची अंलबजावणी होणार आहे. अनेक वर्षांपासून खाजगी संस्थाचालक यासाठी आग्रही असल्याने यासाठी शिक्षण विभाग सकारात्मक असल्याने लवकरच यासंबंधी अधिकृत घोषणा होणार आहे.