नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये १८ महिन्यांनंतर ४ जी इंटरनेट सुविधा सुरळीत करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार्या ३७० अनुच्छेदला ५ ऑगस्ट २०१९ मध्ये हटविल्यानंतर ४ जी इंटनरनेट सेवा थांबविण्यात आली होती. याला जगातील सर्वात मोठं इंटनरनेट शटडाउन मानण्यात आलं होतं.
जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी सांगितलं की, पूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेटसेवा सुरळीत करण्यात आली आहे. विशेष राज्याचा दर्जा मागे घेतल्यानंतर याला कोणत्याही प्रकारे विरोध करण्याच्या शक्यतेनं ४ जी इंटनरनेटसेवा थांबविण्यात आल्याचं त्या वेळी सांगण्यात आलं होतं. ३७० अनुच्छेद हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरला दोन भागात विभागलं होतं. जम्मू-काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
अफवा पसरवणं तसंच दहशतवाद्यांकडून त्याचा गैरवापर होण्याच्या शक्यतेनं मोबाईल इंटरनेटसेवा बंद करण्यात आली होती, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या मुळे मात्र अनेक तरुणांचे रोजगार गेले, तसंच अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला होता, असा आरोप अनेकांनी केला होता.
४ जी मुबारक!
जम्मू-काश्मीरमध्ये हायस्पीड ४जी इंटनरनेटसेवा सुरळीत झाल्याच्या काही तासांनंतर माजी मुख्यमंत्री उमक अब्दुल्ला यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ‘४ जी मुबारक! कधीच नाही याऐवजी उशिरा झालं. देशाचे नवे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे नागरिक १८ महिन्यांनंतर अनेक समस्यांना सामोरे गेल्यानंतर आता ४ जी इंटरनेटसेवेचा लाभ घेऊ शकतात’, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.