नवी दिल्ली – कोरोनाच्या लढ्याविरोधातील मोठी खुषखबर समोर आली आहे. कोरोना संसर्गाविरोधात सध्या देशभरात जोरदार लसीकरण अभियान सुरू आहे. आतापर्यंत ३७ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. सध्या प्रौढांनाच लस दिली जात आहे. लहान मुलांसाठी सध्या लस उपलब्ध नाही. परंतु सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लहान मुलांसाठीसुद्धा कोरोना लस तयार करत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. असा दावा कंपनीने केला आहे.
कोची इथं झालेल्या एका कार्यक्रमात एसआयआयचे आयात-निर्यात संचालक पी. सी. नांबियार यांनी ही माहिती दिली. या ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठी कोविड लस तयार होण्याची शक्यता आहे. बाळांना त्यांच्या जन्माच्या एका महिन्याच्या आत ही लस दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या लसीलाच पुढे औषध म्हणून विकसित केले जाईल, जेणेकरून लहान मुलं कोरोनाबाधित झाल्यास त्यांना त्वरित देता येईल.
क्लिनिकल ट्रायलसाठी अर्ज
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट आणखी चार लशींवर काम करत असून, त्यापैकी एका लशीच्या तिसर्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलसाठी कंपनीने भारतीय औषध नियामककडे परवानगी मागितली आहे. यावर्षी जूनपर्यंत ही लस उपलब्ध होईल, असं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.