नाशिक – नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
भुजबळ हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहे. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.
दिवाळीत खबरदारी घ्या
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण फटाक्यातून अधिक वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
हिवाळी अधिवेशनाबाबत
हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, नागपूर येथील आमदार निवासात कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड चे विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी मागणी आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.