बलिया (उत्तर प्रदेश) – पोलिस विभागातील एका शिपायानं न्यायालयात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. या माहितीवरून पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. चौकशीनंतर कळालं की न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पोलिस शिपायानं पसरवली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत निलंबित करण्यात आलं आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बलियाच्या न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याचा एक मेसेज पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल झाला. काही वेळातच हे प्रकरण गंभीर झालं. न्यायालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. न्यायालयाच्या प्रत्येक कोपर्याची तपासणी करण्यात आली. पण कुठेही बॉम्ब ठेवल्याचे धागेदोरे हाती लागले नाही. त्यानंतर माहिती देणार्या व्यक्तीचा शोध सुरू झाला.
न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याची सूचना एका पोलिस शिपायानं पसरवली होती, असं तापासाअंती सिद्ध झालं. त्यानंतर रात्री नगर पोलिस ठाण्यात संशयित शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी राकेश कुमार याला पोलिस आयुक्तांनी निलंबित करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचलं प्रकरण
न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याची माहिती व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचलं. परंतु थोड्या वेळानंतर ही अफवा असल्याचं सिद्ध झालं. मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना पाचारण केलं. आयजी, डीआयजी, आणि एसपी यांच्याशी संपर्क केल्यानंतर प्रकरणाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर डीजीपी कार्यालयानं कारवाई करण्याचे निर्देश दिले.